एन रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक ; दोघांचा जागीच मृत्यू तर एक जखमी

एन रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक 

दोघांचा जागीच मृत्यू तर एक जखमी

कुही:- कुही ते वदोडा मार्गावर केशोरी बस स्टॉप जवळ एन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कुही तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील खोबना येथील रहिवासी असलेले डालेश्वर राऊत (वय-18) व गौरव राऊत(वय 18) दोघेही चुलत भाऊ मागील 4 ते 5 महिन्यांपासून गुमथडा येथील एका कंपनीत कामाला जात होते. मंगळवारी रात्री कुही येथील एका कंपनीत सोबत काम करणाऱ्या मित्राला घेऊन दुचाकीने कामावर जात असताना कुही ते वदोडा मार्गावरून जात असताना रात्री 10.45 च्या दरम्यान केशोरी बस स्टॉप नजीक रस्त्यावर एक उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. तेवढ्यात समोरून येणाऱ्या कारच्या लाईटचा प्रकाश दुचाकी चालक गौरव राऊत याच्या डोळ्यावर पडल्याने समोरचे काहीच दिसले नाही. त्यामुळे दुचाकी थेट ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली.या भीषण अपघातात दुचाकीवरील गौरव राऊत व डालेश्वर राऊत या दोन्ही चुलत भावंडांचा अपघातस्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.तर कुही येथील युवक जखमी असून त्याला उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. दोन्ही मृतकांना उत्तरीय तपासणीसाठी मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती असून युवकांच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.