एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या विवाहात राडा, २३ वर्षीय तरुणाने जीव गमावला

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या विवाहात राडा, २३ वर्षीय तरुणाने जीव गमावला

कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकतर्फी प्रेमातून भलत्यालाच जीव गमवावा लागला. आरोपीने तरुणीच्या लग्नात जाऊन तमाशे केले आणि तिच्या नातेवाईकाची हत्या केली. त्यामुळे नववर्षापासूनच सुरू झालेले शहरातील खुनाचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये.

बिरजू दिपक वाढवे (वय ३०) लखन वाढवे (वय २८) आणि इप्पू उईके अशी कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर विहंग मनिष रंगारी (२३, रा. टेका नाका) याच्या हत्येचा आरोप आहे. ही घटना रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली.

काय घडलं नेमकं?

विहंग रंगारी याच्या नात्यातील एका तरुणीचे गुरुवारी लग्न होते. या तरुणीवर आरोपी बिरजूचे एकतर्फी प्रेम होते. मात्र, तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी त्याला नकार दिला होता. बिरजू गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळेच त्याला नकार देण्यात  आल्याचे कळते. त्यामुळे तो चिडलेला होता.

गुरुवारी या तरुणीचे लग्न होते. तिचे लग्न झाले. त्यानंतर तो त्याच्या अन्य साथिदारांसह लग्नाच्या मंगल कार्यालयात गेला. तेथे तो तमाशा करू लागला. यावर तरुणीचे कुटुंबीय त्याला बाहेर काढू लागले. विहंग रंगारी सुद्धा त्याला बाहेर काढू लागला. यावर बिरजूने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तू शिवीगाळ का करतो आहेस? हे लग्नघर आहे, ’ असे विहंग रंगारी त्याला बोलला. यावर रागाच्या भरात आरोपी व त्याच्या साथिदारांनी विहंग रंगारीवर हल्ला चढविला. त्याच्यावर चाकूने वार केले तसेच त्याच्या डोक्यावर दगडाने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.