राज्यावर अवकाळी पावसाचे संकट गडद
नागपूर, भंडारा येथे पहाटे अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत
नागपूर : राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढला असतानाच अवकाळीचे संकट घोंगावत आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. विदर्भातील नागपूर, भंडारा व गोंदिया शहरात अवकाळीने बराच वेळ ठाण मांडले. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रविवारी मध्यरात्रीपासून तर पहाटेपर्यंत नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांवर संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नागपूर, भंडाऱ्यात विजांसह पाऊस
नागपूर शहरात मध्यरात्री अचानक मुसळधार सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला होता. भंडारा जिल्ह्यात पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोर धरला. चना, तूर, मूग, उडीद यांसारख्या कडधान्य पिकांसह भाजीपाला पिकांना या पावसाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र उन्हाळी भात पिकासाठी हा पाऊस काही प्रमाणात लाभदायक ठरू शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. गोंदिया जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत. गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यांत विजांसह पावसाची नोंद झाली. रब्बी हंगामातील धान पिकाला काहीसा फायदा होण्याची शक्यता असली तरी बागायती शेती आणि कडधान्य पिकांसाठी धोका कायम आहे.
हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याने २३ आणि २४ फेब्रुवारीदरम्यान विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातही रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंब्याच्या झाडांना आलेला मोहोर आणि लागलेली फळे गळून पडल्याने आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.
लातूरमध्येही मध्यरात्रीपासून सरी कोसळल्या. राजीव गांधी चौक, उद्योग भवन, गरुड चौक परिसरात सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी विदर्भातील रब्बी पिकांसाठी निर्माण झालेली धाकधूक मात्र कायम आहे.






