कुही औद्योगिक क्षेत्राच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी ; पहिल्या टप्प्यात 419.76 हेक्टर क्षेत्र संपादन करण्यास मिळाली मान्यता
राजू पारवे यांच्या प्रयत्नांना अखेर यश
कुही:- गेल्या काही वर्षांपासून कुही तालुक्यात रोजगार निर्मिती करिता एमआयडीसीची मागणी होत होती. दरम्यान आमदार असताना राजू पारवे यांनी हा विषय सातत्याने उचलून धरला होता. त्यात त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून नुकत्याच झालेल्या उद्योग मंत्रालयाच्या बैठकीत महाराष्ट्र विकास महामंडळ अंतर्गत कुही औद्योगिक क्षेत्राच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.यात पहिल्या टप्प्यात 419.76 हेक्टर क्षेत्र संपादन करण्यास मान्यता मिळाली आहे.

तालुका निर्मिती पासून कायम पिछाडीवर असलेला कुही तालुका विकासाच्या बाबतीतही जिल्ह्यात शेवटचा गणला जात होता. त्यात गोसेखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पात तालुक्यातील अनेक गावे व शेतशिवार पाण्याखाली गेले. तत्कालीन वेळी शासनाने प्रकल्प बाधितांना याचा मोबदला देत गावे पुनर्वसित केली. मात्र यातील क्वचितच लोकांनी संधीचे सोने केले. मिळालेल्या मोबदल्याचा योग्य वापर न केल्याने अनेकजन उध्वस्त झाले.त्यात ना शेती राहिली ना काम त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली. तर दुसरीकडे उमरेड-कऱ्हान्डला अभयारण्य प्रकल्पातही निराशाच आली. त्यात MIDC मध्ये अनेक कंपन्या बंद असून आहे त्यात परप्रांतीय कामावर असल्याने आजपर्यंत तालुक्यात रोजगार हाच सर्वात मोठा प्रश्न घेऊन आजपर्यंत जिल्हा परिषद ते खासदारकीच्या मुद्यावर निवडणुका झाल्या.
त्यात माजी आमदार राजू पारवे हे कुही तालुक्यातील रोजगारासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. पारवे यांनी याबाबत २०२२ ला तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना कुही तालुक्यात २००० हजार हेक्टर नवीन महाराष्ट्र औद्योगिक विकास प्रकल्प मंजूर करण्याची मागणी केली होती. व त्याचा आतापर्यंत सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यात नुकतेच झालेल्या सचिव उद्योग तथा अध्यक्ष उच्चाधिकार समिती यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यात १००० हेक्टर आर क्षेत्र संपादित करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात मौजा मांगली व मौजा खापरी येथील ४०३.३९ हे.आर व सरकारी १६.३७ हे.आर अशी एकुन एकूण ४१९.७६ हे.आर क्षेत्र संपादन करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे तालुक्यात नवे मोठे उद्योग येणार असून तालुक्यातील रोजगाराचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. यात तालुक्यात नवे २००० रोजगार निर्माण होणार असून इतरही उद्योग धंद्यांना चालना मिळणार आहे.
राजूभाऊ पारवे यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांपासून तालुक्यावर लागलेला अंधारलेला तालुका हा शब्द मोडून प्रकाशमय कुही तालुका असा झाला आहे. औद्योगिक क्षेत्र प्रकल्पाने अनेक होतकरू लोकांच्या हाती काम येईल.
– श्री. सुनील जुवार, जिल्हा महामंत्री भाजप
तालुक्यातील वाढती बेरोजगारी पाहता नव्याने औद्योगिक विकास प्रकल्प तरुणांसाठी वरदान ठरणार आहे. राजूभाऊ यांच्या पुढाकाराने कुही तालुका समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
– श्री. निखील येळणे , नगरसेवक
या प्रकल्पाने कुही तालुका समृद्ध होईल. रोजगारासह आजूबाजूच्या गावांचा विकास होऊन तालुक्यात नव्या उद्योगांना चालना मिळेल. राजुभाऊ पारवे यांच्या प्रयत्नानेच हे सार्थक झाले.
– श्री.सौरभ दंडारे , भाजप युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष


