नागपूर : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी दोन मुलींची विवस्त्र पूजा, भोंदूबाबाकडून बलात्कार
नागपूर : मध्यरात्री नग्नपूजा केल्यानंतर नोटांचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवून दोन मुलींना पूजेसाठी तयार केले. मात्र, नग्नपूजा करताना दोन्ही मुलींवर भोंदबाबाने बलात्कार केला. रात्रभर पूजा केल्यानंतरही पैशांचा पाऊस न पडल्यामुळे भोंदूबाबाचे बींग फुटले. हा धक्कादायक प्रकार मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी दोन्ही मुलींनी मित्राच्या मदतीने पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी भोंदुबाबासह चार आरोपींना अटक केली. त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आरोपी आशीष व त्याची पत्नी हे दोघेही कपीलनगरात राहणाऱ्या कदीलबाबा याचे भक्त आहेत. कदील बाबाने आशिषला नोटांचा पाऊस पाडण्याबाबत विश्वास दर्शवला. त्यासाठी दोन अल्पवयीन मुलींची मध्यरात्री नग्न पूजा करावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे आशिषने आपल्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून पीडित सोनाली आणि मोनाली (काल्पनिक नावे) यांच्याशी संपर्क साधला. दोन्ही मुलींची घरची स्थिती हलाकीची आहे. त्यामुळे पैशांच्या आमिषाने दोघीही नग्नपूजा करण्यासाठी तयार झाल्या. रविवारी मध्यरात्री पूजा करण्याचे ठरले. दरम्यान, सोनाली-मोनालीचा मित्र आदू याला याबाबत माहिती मिळाली. त्याने दोन्ही मुलींना भोंदूबाबावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आणि निघून गेला.

रविवारी भोंदूबाबा कदील याने आशिषच्या घरी दोन्ही मुलींना बोलावून घेतले. मध्यरात्री दोघींचीही नग्नपूजा केली. यादरम्यान, दोघींवरही बलात्कार केला. मात्र, रात्रभर पूजा केल्यानंतरही नोटांचा पाऊस पडला नाही. त्यामुळे मुलींना एक पैसाही न देता घराकडे परत पाठवले. हिरमोड झालेल्या सोनाली आणि मोनाली दुसऱ्या दिवशी मित्र आदूला भेटल्या. त्यांनी भोंदूबाबाने बलात्कार केल्याचे सांगितले. त्याने दोन्ही मुलींना मानकापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. मुलींनी पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली.


