प्रियकराने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या नवऱ्याला संपवले

प्रियकराने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या नवऱ्याला संपवले

नागपूर : प्रेमात अडसर ठरत असल्याने प्रियकराने साथीदाराच्या मदतीने कोयत्याने वार करून प्रेयसीच्या पतीची हत्या केली. ही थरारक घटना रात्री पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदगिरी मार्गावरील समाजभवनजवळ घडली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन मारेकऱ्यांना अटक केली. शेरा (वय ३२), असे मृतकाचे तर रजत ऊर्फ गीतेश कमलेश उके (वय ३२) व भोजराज मोरेश्‍वर कुंभारे (वय ३४, दोन्ही रा. नाईक तलाव, पाचपावली),अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत.

शेरा हा सरपंच भवन येथे सफाई कर्मचारी होता. रजत याच्याविरुद्ध मारहाणीचे दोन गुन्हे दाखल असून तो कुलर दुरूस्तीचे काम करायचा. भोजराज हा श्रमिक आहे. गेल्या दोन वर्षांपासून रजत याचे शेराच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध आहेत. याबाबत शेराला माहिती मिळाली. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. काही दिवंसापूर्वी रजत याने शेराच्या नातेवाइक तरुणीशी संपर्क साधला. याबाबत कळताच शेरा व रजतमध्ये वाद झाला. दोघांनी एकमेकांना ठार मारण्याची धमकी दिली. शेरा हा आपल्याला ठार मारेल, अशी भीती रजतला वाटू लागली. रात्री शेरा हा सासूला बघण्यासाठी आला. शेराची माहिती घेण्यासाठी रजतने भोजराजला पाठविले. शेरा सासूच्या घराबाहेर निघताच भोजराजने रजतला माहिती दिली.

रजत याने समाज भवन परिसरात शेराला गाठले. काही वेळातच भोजराजही तेथे आला. भोजराजने शेराला पकडले. रजतने कोयत्याने गळ्यावर वार करून शेराचा खून केला त्यानंतर रजत व भोजराजने पाचपावली पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.