व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर मैत्रीसाठी दबाव ; आरोपी युवकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर मैत्रीसाठी दबाव ; आरोपी युवकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नागपूर : शहरातील एका विद्यार्थिनीचा चोरून खासगी व्हिडिओ काढत तिच्यावर मैत्री करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका युवकाला सदर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अश्विन दासर असून तो पीडित विद्यार्थिनीचा पूर्वीचा मित्र आहे. नात्यात दुरावा आल्याने दोघांमध्ये ब्रेकअप झाले होते. मात्र, अश्विनने तिचा पाठलाग करणे थांबवले नाही.

पीडित विद्यार्थिनी  एका खाजगी महाविद्यालयात शिक्षण घेत असून सदर परिसरात एका घरात भाड्याने राहत होती. त्या घराच्या मालक महिलेचा पुतण्या अश्विन दासर हा वारंवार त्या घरात येत असे. त्याचे आणि विद्यार्थिनीचे पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, काही काळापूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले. या दरम्यान, आरोपी अश्विनने संधीचा फायदा घेत विद्यार्थिनीचा बाथरूममधील आंघोळ करतानाचा गुप्त व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर तो व्हिडिओ दाखवून त्याने विद्यार्थिनीवर मानसिक दबाव आणत पुन्हा मैत्री करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला.

या घटनेने घाबरलेली विद्यार्थिनी ती खोली सोडून वसतिगृहात राहायला गेली. मात्र, आरोपी तिथेही पोहोचत तिचा पाठलाग करू लागला. आरोपीने विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीदायक प्रसंगानंतर पीडित मुलीने सदर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.