ई – पीक पाहणी ॲपचा शेतकऱ्यांच्या डोक्याला मनस्ताप
# पेरणीला दीड महिना उलटूनही ॲप सुरू झाले नाही
# पिकांची नोंद करावी कुठे ?
कुही :- ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया ही शेतकऱ्यांना संकट काळात नुकसान भरपाईसाठी जलद लाभ व्हावा, या हेतूने हा प्रकल्प राज्यात राबवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी महा -ई- सेवा किंवा इतर केंद्रामध्ये जाऊन आपली पिक पाहणी करावी लागत होती. परंतु आता घरबसल्या शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलच्या साहाय्याने अगदी काही क्षणामध्ये पीक पाहणी करू शकत होते. तेही अगदी मोफत ई – पीक पाहणी घरबसल्या करता यावी यासाठी सरकारने ई पीक पाहणी ॲप लॉन्च केले आहे. या ॲपच्या माध्यमातून अगदी काही क्षणातच घरबसल्या आपणास आपल्या पिकाची पाहणी करता येते.माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा असा नारा देत या ॲपची निर्मिती करण्यात आली. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन स्वतःच पिक पेरा नोंदवावा हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता. यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणीस सुरुवात केली. आता पेरणी होऊन जवळपास दोन महिने उलटले तरीही सदर ॲप सुरूच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिक पाहणी किंवा पीक नोंदणी अद्यापही बाकी आहे. १ ऑगस्ट नंतर हे ॲप सुरू होण्याचे होणार असल्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे . ज्यांनी उडीद, मूंग या अल्प मुदतीच्या पिकाची लागवड केली. त्यांचे पीक परिपक्व किंवा काढणीच्या अवस्थेत आले. जर पिकाची काढणी केली मग नोंदणी कधी करायची असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे मुंग, उडीद पिकाच नुकसान झाले आहे. पिकाची नोंदणी झाली नसेल तर विमा कंपनी सदर मूंग, उडीद पिकाचा नुकसान देणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोयाबीन , कापसाचे पीक सततच्या पावसामुळे खराब झाले आहे. पिकांची अद्यापही त्याची नोंद नाही. विमा मिळणार की नाही यात शंकाच तरी हे ॲप दरवर्षी जून महिन्यात सुरु करावे जेणेकरून अशा समस्यांना शेतकऱ्यांना भविष्यात सामोरे जावे लागणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.