वाहतूक पोलिसांना स्वतःच्या मोबाईलवरून फोटो काढून दंड आकारता येणार नाही ; अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांचे आदेश

वाहतूक पोलिसांना स्वतःच्या मोबाईलवरून फोटो काढून दंड आकारता येणार नाही ; अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांचे आदेश

मुंबई : वाहन चालवताना नियमांचं उल्लंघन झाल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकदा हे वाहतूक पोलिस ई-चालान करताना अधिकृत मशिन न वापरता खाजगी मोबाईलवरून दंड आकारत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अनेक तक्रारीही आल्या आहेत. त्यामुळेच आता अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी यासंबंधी पत्र जारी करत शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे.

राज्यातील वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार वाहने थांबवून स्वतःच्या मोबाईल फोनचा वापर करून फोटो, चित्रीकरण करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. अशाप्रकारे स्वत:च्या फोनवरून वाहतूक पोलिस कर्मचारी, अंमलदार यांना दंडात्मक कारवाई करता येत नाही. असे असतानाही हे कर्मचारी वाहनचालकांवर कारवाई करून दंड आकारत असल्याचे पुढे आले आहे. असे न करण्याबाबत यापूर्वीच संबंधित विभागाला आदेशित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही पोलिस अधिकारी, अंमलदार हे स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो, चित्रीकरण करून दंड आकारत आहेत. या संदर्भात तशा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता संबंधित पोलिसांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर, उपमहानिरीक्षक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार, यापुढे सर्व दंडात्मक कारवाई अधिकृत कॅमेर्‍यांद्वारे, सिस्टमवर रेकॉर्ड ठेवून आणि रियल टाईम डेटाच्या आधारे केली जावी, असे आदेश देण्यात आले. जर एखाद्या पोलिसाने स्वतःच्या मोबाईलवर फोटो काढून दंडात्मक कारवाई केली, तर त्याच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे बजावण्यात आले. यासंबंधिचा आदेश 3 जुलै रोजी सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांना अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी जारी करून तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.