नागपूरला तापमानवाढीचा धोका : मानवी आरोग्य व रब्बी पिके धोक्यात ; नीरीचा शास्त्रीय अभ्यास
नागपूर : हवामान बदलाचे परिणाम आता नगरी जीवनावर ठळकपणे दिसू लागले आहेत. विशेषतः २००० नंतरच्या वर्षांमध्ये शहरात तापमान वाढीचा ट्रेन्ड दिसून येत आहे. हा फटका आता नागपूरलासुद्धा बसू शकतो. शहरातील वाढत्या तापमानामुळे रब्बी हंगामातील शेती व मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. शहरातील राष्टीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने केलेल्या शास्त्रीय अभ्यासातून हे सत्य समोर आले आहे.
शहरात होत असलेल्या सिमेंटीकरणामुळे रस्त्यांवरील वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा दावा करणारी जनहित याचिका पर्यावरण तज्ज्ञांनी दाखल केली असून ती प्रलंबित आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मनपाने अलीकडेच शहराचा पर्यावरण (२०२३-२४) अहवाल सादर केला. नीरीने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात शहराच्या पर्यावरणाशी निगडित विविध मुद्यांवर अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदविली आहेत. यात १९७० ते २०२४ या कालावधीतील तपशीलवार अभ्यासात स्पष्ट झाले की २००० नंतरच्या सुमारे ७५ टक्के वर्षांमध्ये नागपूर शहरातील सरासरी कमाल तापमानात वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे उन्हाळ्याच्या तुलनेत मान्सून, मान्सूननंतर व हिवाळ्याच्या कालावधीत ही वाढ अधिक ठळक आहे. मान्सून काळाचा विचार केल्यास, यातील दहा पैकी नऊ वर्षांमध्ये, तर मान्सूननंतरच्या काळात तब्बल ८७.५ टक्के वर्षांमध्ये या तापमान वाढीचा ट्रेन्ड दिसून आला. हिवाळ्यातही ७० टक्के वर्षांमध्ये हा ट्रेन्ड दिसतो.

विशेषतः हिवाळ्यातील वाढत्या तापमानामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, तूर यासारख्या पिकांच्या उत्पादनावर थेट परिणाम होण्याची भीती आहे. तापमान वाढीमुळे वनस्पतींच्या वाढीचा कालावधी कमी होतो, परागसिंचनात अडथळा येतो आणि उत्पादनात घट होते. वाढत्या तापमानामुळे खालच्या स्तरावरील ओझोन पातळीत वाढ होते. यामुळे हवेची गुणवत्ता खालावते व त्यामुळे दमा, फुफ्फुसांचे आजार, त्वचारोग, डोळ्यांची जळजळ अशा विविध त्रासांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यातील उष्णतेमुळे कोरडे दुष्काळ, वणवे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्येही वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे.
