`मुरलीबाग’ : युवा समाज प्रबोधनकार आकाश टाले यांचा अनोखा उपक्रम ; वडिलांच्या स्मृतीला वृक्षारोपणातून निसर्गमय आदरांजली
(स्वप्नील खानोरकर)
कुही :– “किती झाडं लावली यापेक्षा किती झाडं जगवली हे महत्त्वाचं!” या उद्गारातून समाजासमोर प्रेरणा ठरलेल्या वृक्षारोपण उपक्रमातून युवा समाज प्रबोधनकार व सप्तखंजेरीवादक आकाश टाले यांनी वडिलांच्या स्मृतीला निसर्गमय आदरांजली अर्पण केली.

वडील निसर्गवासी मुरलीधर टाले यांच्या निधनाच्या निमित्ताने त्यांनी वडिलांच्या वया इतकी म्हणजेच ५९ झाडं लावण्याचा संकल्प घेतला होता. मात्र लोकांचा पाठिंबा व सकारात्मक प्रतिसादामुळे हा संकल्प केवळ आकड्यापुरता मर्यादित न राहता १८० फळझाडांपर्यंत पोहोचला आणि ‘मुरलीबाग’ हा एक सामाजिक-निसर्ग चळवळीचा प्रारंभ ठरला. या उपक्रमांतर्गत आंबा, सीताफळ, संत्रा, चिककू, काजू, मोसंबी, पेरू अशा नानाविध फळझाडांची लागवड, जिल्हा परिषद शाळा जीवनापूर, सोनेगाव, सावंगी, हनुमान मंदिर देवस्थान व बौद्ध विहार पंचकमेटी या ठिकाणी मोठ्या समर्पणाने करण्यात आली. प्रत्येक झाडामागे एक भावना, एक आठवण जपली गेली. वृक्षारोपणावेळी बोलताना आकाश टाले म्हणाले, “माझ्या वडिलांनी केवळ ५९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला, परंतु त्यांच्या साधेपणा, सेवाभाव आणि निस्सीम माणुसकीचे संस्कार आजही आमच्या जीवनात जिवंत आहेत. ही ‘मुरलीबाग’ म्हणजे त्यांना दिलेली सजीव श्रद्धांजली आहे. या उपक्रमात एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हितेश रामटेके, गणपत धार्मिक, शिक्षक डाकराम नरुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसह या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वखुशीने स्वीकारली. शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक जाणीव जागवणारा हा उपक्रम शिक्षकांनी स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध केला. कार्यक्रमाला जीवनापूरचे सरपंच सविता शिवरकर, उपसरपंच अनिल कुकुडकार, सोनेगावचे सरपंच सौरव आंबोणे, उपसरपंच जगदीश बांते, तसेच विविध ग्रामपंचायतीतील पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता न राहता एक सामाजिक चळवळ बनावा, प्रत्येक कुटुंबानं एक झाड लावावं, जपावं आणि पुढच्या पिढीसाठी हिरवळ ठेवा म्हणून ही ‘मुरलीबाग’ एक आदर्श ठरते आहे.
