पचखेडीची ऐतिहासिक शान : शंभर वर्षांच्यावर बडगा – मारबत मिरवणूकची परंपरा…

पचखेडीची ऐतिहासिक शान : शंभर वर्षांच्यावर बडगा – मारबत मिरवणूकची परंपरा…

देशात बडगा – मारबत उत्सवात मिरवणारे  एकमेव गाव

स्वप्नील खानोरकर

कुही : रसाळ संत्री आणि तर्री पोहे यांच्या ओळखीपेक्षा नागपूरची खरी वेगळी ओळख सांगायची झाल्यास ती म्हणजे मारबत मिरवणूक. देशात मारबत मिरवणारे एकमेव शहर म्हणजे नागपूर. याच नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील पचखेडी (गांडली) गाव मात्र ‘बडगा मारबत उत्सवाचा गाव’ म्हणून देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शंभरपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव दरवर्षी बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. कोरोना काळात एक वर्ष अपवाद वगळता या परंपरेत कधीच खंड पडला नाही.

सामान्यतः नागपूर शहरात काळी आणि पिवळी मारबत नाचवली जाते. परंतु पचखेडी गावात याचबरोबर “बडगा मारबत” ही विशेष मिरवणूक काढली जाते. वर्षभर देशात किंवा राज्यात घडलेल्या घटनांवर, अन्याय, भ्रष्टाचार,  शेतकऱ्यांच्या समस्या अशा विषयांवर भाष्य करणारे बडगे उभारले जातात. या प्रथेच्या माध्यमातून थेट जळजळीत सामाजिक संदेश दिला जातो. पचखेडी गावात काढली जाणारी १५ ते २० फूट उंचीचे भव्य बडगा व मारबत नाचताना पाहण्याचे कुतूहल हजारो लोकांना खेचून आणते. गावात गुजरी चौक, आजाद चौक व गांडली वाडा चौकातून मिरवणूक निघते. शेवटी या मिरवणुका तिन्ही गुजरी चौक व बसस्टॉप चौक येथे एकत्र येतात. डीजेच्या तालावर नाचणारी पब्लिक, माशी मोंगसा घेऊन जागे मारबतचा गजर आणि बडगा मारबत नाचवण्याचे थरारक दृश्य  हे सर्व पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर बाहेरगावाहून आलेली गर्दी तुफान उत्साहात सहभागी होते.

देशातील इतर ठिकाणी गेल्या काही वर्षांत मारबत मिरवणुकीच्या नकला सुरू झाल्या असल्या, तरी “पचखेडीचा बडगा मारबत” हा अस्सल व ऐतिहासिक वारसा कुठेच दिसणार नाही. या गावातील  ही परंपरा इतरत्र कधीच जाणार नाही. या मिरवणुकीसाठी दरवर्षी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. गर्दी शिस्तबद्ध राहावी, कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पोलिस प्रशासन आणि गावकरी उत्सवात एकदिलाने सहभाग घेतात. शेवटी मारबत आणि बडग्यांचे दहन केले जाते. देशात मारबत मिरवणारे एकमेव शहर म्हणजे नागपूर आणि त्यात बडगा मारबत उत्सव साजरा करणारे एकमेव गाव म्हणजे पचखेडी. नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेत पचखेडी गावाचा बडगा मारबत हा मानाचा तुरा ठरतो.