शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात रॅगिंग ; कनिष्ठ विद्यार्थिनींचा छळ

नागपूर : येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील मुलींच्या वसतिगृहात मागील २० दिवसांत दोन वेळा कनिष्ठ विद्यार्थिनींची रॅगिंग झाल्याची तक्रार आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाचे धाबे दणाणले असून या प्रकरणात अंतर्गत चौकशी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु, चौकशी अहवालानंतरच येथे प्रत्यक्षात काय झाले याबाबत स्पष्टता येणार आहे.
महाविद्यालयांमध्ये कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग घेणे कायद्याने गुन्हा आहे. दोष सिद्ध झाल्यास आरोपींना शिक्षेचीही तरतूद आहे. त्याबाबत केंद्र व राज्य शासनासह सगळ्याच महाविद्यालयांकडून वारंवार जनजागृती मोहीम राबवली जाते. त्यानंतरही काही महाविद्यालयांमध्ये रॅगिंग होत असल्याचे कटू वास्तव आहे. शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात मागील २० दिवसांत दोन वेळा कनिष्ठ विद्यार्थिनींची रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार थेट केंद्रीय रॅगिंग समितीकडे करण्यात आली. तेथून ही तक्रार आयुर्वेद महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांकडे आली आहे. तक्रारदाराने स्वत:चे नाव उघड करू इच्छित नसल्याचे सांगत मुलींच्या वसतिगृहातील नवीन विद्यार्थिनींच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या छळावर बोट ठेवले आहे. हा प्रकार रात्री १० वाजतानंतरच घडत असल्याचेही तक्रारीत सांगण्यात आले आहे. त्यामुळे आयुर्वेद महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात हा प्रकार येत नसल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

नवीन विद्यार्थिनींचा त्रास दूर करण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेपाची विनंतीही तक्रारीत करण्यात आली. सोबत या प्रकरणात रॅगिंग विरोधी समितीतर्फे चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाईची मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य बघत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अॅन्टी रॅगिंग समितीमार्फत चौकशीही सुरू केली आहे. चौकशी अहवालात काय निदर्शनात येईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.







