पत्नीची हत्या, नंतर मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले अन्…; हैदराबादमधील हृदयद्रावक घटना
हैदराबादमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. जिथे एका माजी सैनिकावर त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण श्रद्धा खून आणि मीरा रोड प्रकरणाशी बरेच साम्य आहे. याप्रकरणामध्ये पतीने मृतदेहाचे छोटे तुकडे केले आणि नंतर ते कुकरमध्ये शिजवले. एवढेच नाही तर त्यानंतर त्याने मृतदेहाची सहज विल्हेवाट लावता यावी आणि कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून शिजवलेले तुकडे मिरपेट तलावात फेकून दिले. याप्रकरणाचा सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की, सहा दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एक ३५ वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. यानंतर, तिच्या पतीने बुधवारी दावा केला की त्याने तिची हत्या केली आणि जिलेलगुडा तलावासह अनेक ठिकाणी तिच्या शरीराचे अवयव फेकून दिले.

- पोलिसांनी धक्कादायक खुलासे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ४५ वर्षीय माजी सैनिकाच्या दाव्यांची पडताळणी करत आहेत. आरोपी सैनिक म्हणतो की त्याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे केले आणि ते तुकडे कुकरमध्ये शिजवले. आरोपीचे नाव गुरुमूर्ती असे आहे. त्यांना पी वेंकट माधवी या महिलेच्या शरीराचा कोणताही भाग सापडला नाही, आरोपी गुरुमूर्तीने असा दावा केला आहे की त्याने शिजवलेले शरीराचे भाग फेकून दिले होते.
खरंतर, माधवी १६ जानेवारी रोजी हैदराबादच्या मीरपेट भागातून बेपत्ता झाली होती. गुरुमूर्ती यांचे माधवीशी १३ वर्षे लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत. पोलिसांनी सांगितले की, मीरपेटमधील न्यू वेंकटेश्वर नगर कॉलनीतील रहिवासी गुरुमूर्ती १८ जानेवारी रोजी त्याच्या सासरच्या लोकांसह तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. परंतु सुरुवातीला त्याने त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान, गुरुमूर्तीने पोलिसांना सांगितले की १६ जानेवारी रोजी सकाळी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर ती रागाच्या भरात घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. मात्र माधवीचा शोध जसजसा वाढत गेला तसतसे पोलिसांना तिच्या पतीवर संशय आला आणि त्यांनी त्याची पुन्हा चौकशी केली.
गुरुमूर्ती यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्यात गेल्या काही दिवसांपासून भांडण सुरू होते. आरोपीने असेही सांगितले की, महिलेला संक्रांतीच्या सणासाठी आंध्र प्रदेशातील तिच्या मूळ गावी नांद्याल येथे जायचे होते आणि ज्या दिवशी ती बेपत्ता झाली त्या दिवशी तिचे भांडण झाले. त्याची दोन्ही मुले त्याच्या बहिणीच्या घरी होती. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



