पत्नीला घ्यायला गेलेल्या जावयाचा मेहुण्याने केला विटेने डोके ठेचून खून

पत्नीला घ्यायला गेलेल्या जावयाचा मेहुण्याने केला विटेने डोके ठेचून खून

नागपूर : पत्नीच्या विहरामुळे तो तणावात राहायला लागला. पत्नीला परत पाठवा अशी विनवणी तो सासरच्यांना करायला लागला. विनवणी करतानाचा युवकाचा मेहुण्यासोबत वाद झाला. वाद विकोपाला गेला अन् मेहुण्याने जावयाला संपविले. ही थरारक घटना नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कळमना गावात घडली. ताराचंद शिवचरण प्रजापती (वय 35, रा. गोकुलनगर, कळमना) असे मृतकाचे नाव आहे. राहुल दिलीप इंगळे (वय 24) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दहा वर्षांपूर्वी ताराचंद याचे ज्योती यांच्यासोबत लग्न झाले. त्यांच्यात खटके उडायला लागले. दीड महिन्यापूर्वी ज्योती या माहेरी गेल्या. पत्नीच्या विरहात ताराचंद तणावात राहायला लागले. परत आणण्यासाठी ताराचंद हो नेहमी सासरी जायचा. ज्योती या परत येण्यास नकार द्यायच्या. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ताराचंद हा सासरी गेला. त्याने ज्योती यांना परत चालण्यास म्हटले. यावेळी राहुल तेथे आला. माझ्या पत्नीला परत का पाठवत नाही, असे ताराचंद राहुल याला म्हणाले.

दोघांमधील वाद विकोपाला जाताच राहुलने विटेने डोके ठेचून ताराचंदची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी राहुल याला अटक केली. त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.