सावत्र मुलीच्या चौथ्या नवऱ्याने 58 वर्षीय मायाताईला भररस्त्यात संपवलं ; आरोपी मुस्तफा खान मोहम्मद खान अटकेत
नागपूर : पैशाच्या वादातून पत्नीच्या सावत्र आईची हत्या केल्याची घटना नागपुरातील सिव्हिन लाईन्ससारख्या उच्चभ्रू परिसरात घडली. दिवसा ढवळ्या भररस्त्यात झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. माया पसेरकर, वय 58 वर्ष, असे या मृत महिलेचे नाव आहे. तर मुस्तफा खान मोहम्मद खान याच्यावर तिच्या हत्येचा आरोप आहे. आरोपी मुस्तफा हा मायाची सावत्र मुलगी गीता हिचा चौथा नवरा असल्याचे कळते.
उसने दिसेले पैसे परत मिळत नसल्याने मुस्तफाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सिव्हिल लाईन्समधील आमदार निवाससमोरील परिसरात दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी माया पसेरकर यांची सावत्र मुलगी गीता हिचा नवरा मुस्तफा खान मोहम्मद खान याला अटक केली. गीताचा यापूर्वी तीन वेळा विवाह झाला असून मुस्तफा हा तिचा चौथा नवरा आहे. मुस्तफाचा सावत्र सासू माया यांच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून पाच लाख रुपयांवरून वाद सुरू होता. माया या जवाहर विद्यार्थी गृहाच्या मागच्या बाजुला राहतात. त्या परिसरातील एका बंगल्यात घरकाम करीत असत.

दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्या काम आटोपून घरी जात होत्या. उधार घेतलेले पाच लाख रुपये माया परत देत नसल्याने मुस्तफा चिडलेला होता. मुस्तफाने त्यांना रस्त्यातच गाठले व त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. जीव वाचविण्यासाठी त्या पळू लागल्या. काही पावले जाताच त्या रस्त्यावर कोसळल्या व त्यांचा जागेवर मृत्यू झाला. जवाहर वसतिगृहाला लागून असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटसमोर पदपथावर माया रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
