बँक कर्मचारी विवाहितेचे सायकल विक्री व्यावसायिकाशी अनैतिक संबंध ; वैतागलेल्या नवऱ्याने दोघांवरही केला प्राणघातक हल्ला

बँक कर्मचारी विवाहितेचे सायकल विक्री व्यावसायिकाशी अनैतिक संबंध ; वैतागलेल्या नवऱ्याने दोघांवरही केला प्राणघातक हल्ला

नागपूर : अनैतिक संबंधामुळे त्रस्त पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकरावर विविध ठिकाणी जीवघेणा हल्ला केला. नागपूरमधील सदर व सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. दोन्ही प्रकरणी सदर व सीताबर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल करून हल्लेखोर पतीला अटक केली आहे. अजय, वय ४० वर्ष, रा. नरसाळा रोड, असे अटक केलेल्या हल्लेखोर पतीचे, तर अंजली आणि सुनील (सर्वांची नावे बदललेली) अशी जखमी पत्नी आणि प्रियकराची नावे आहेत.

अजय हा खासगी काम करतो. अंजली ही सदरमधील बँकेत कर्मचारी असून सुनील याचा सायकल विक्रीचा व्यवसाय आहे. सुनील व अंजलीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती अजयला मिळाली. अजयने अंजलीला विचारणा केली त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. याच कारणावरून दोघांमध्ये सतत वाद सुरू झाला. अजयने वेगळे राहण्याचीही धमकी अंजलीला दिली. दरम्यान अजय संतापला, त्याने अंजली व सुनीलचा काटा काढण्याचा कट आखला. सोमवारी दुपारी तो सुनीलच्या सीताबर्डी परिसरातील दुकानात गेला. त्याने लोखंडी वस्तूने सुनीलच्या डोक्यावर वार केला व तेथून पसार झाला. त्यानंतर तो अंजलीच्या बँकेत गेला. तेथे गोंधळ घालायला सुरूवात केली. तो तिला पार्किंगस्थळी घेऊन आला. त्यानंतर तिच्यावर गळ्यावर चाकूने वार करून तिला जखमी केले.

तेथे उपस्थित नागरिकांनी त्याला पकडले. अंजलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. एका नागरिकाने सदर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी अजयला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.