तोंडावर पट्टी, चादरीत गुंडाळलं : दोन दिवसांचं बाळ कचरापेटीजवळ ; नागपूरात मन हेलावणारी घटना

नागपूर : नवजात बाळ ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडाला पट्टी बांधून कचरापेटीच्या जवळ फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. एका रिक्षाचालकाला ते बाळ दिसताच त्याने त्याला उचलून रुग्णालयात नेले. बाळाची प्रकृती आता उत्तम असून त्याच्या मात्यापित्याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.
विवाहबाह्य संबंधांमधून जन्माला आलेली मुले, प्रेमसंबंधातून जन्माला आलेले, गरिबीमुळे सोडलेली, अवैध दत्तक प्रकरणातील, अल्पवयीन गर्भवती मुलींकडून जन्माला आलेली, आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर एकाकी पडलेल्या मुलांना असे निराधार सोडले जात असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. अलीकडेच घडलेल्या एका घटनेने विकृतीचा कळस गाठला. शेख कलाम हे रिक्षाचालक आपल्या रिक्षात विद्यार्थ्यांची ने-आण करतात. गोरेवाडा येथील एका शाळेतील मुलांना शाळेत सोडल्यांतर हा रिक्षावाला घरी जाण्यासाठी निघाला. खदान मार्गातून गीतांजली चौकाकडे जाणाऱ्या मार्गाने तो जात असताना चौकाजवळ त्याला गर्दी दिसली.

एका इमारतीच्या मागे कचरापेटीच्या बाजुला एक नवजात मुलगा पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या टॉवेल आणि चादरीत गुंडाळलेला आढळून आला. त्या बाळाचे डोळे बंद होते. एक ते दोन दिवसाचे असलेले बाळ रडू नये म्हणून त्याच्या तोंडाला पट्टीही बांधण्यात आली होती. ते दृश्य बघून गहिवरलेल्या रिक्षाचालकाने माणुसकीचे दर्शन घडवत या मुलाला घेऊन मेयो रुग्णालय गाठले. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. त्या बाळावर योग्य उपचार करण्यात आले. त्या मुलाला वाचविणे हे माझे कर्तव्य होते, अशी भावना या रिक्षाचालकाने व्यक्त केली.







