मांढळ बसस्थानकावर भंडारा डेपोच्या बस चालकाची मुजोरी : रस्त्याच्या मध्यभागी बस उभी केल्याने वाहतुकीची कोंडी प्रवाशांची गैरसोय ; उद्धट वर्तन करणाऱ्या चालकावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
कुही : मांढळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित बसस्थानक परिसरात भंडारा डेपोच्या बस चालकाने भंडारा – आंभोरा ही बस थेट नवेगाव रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी सायंकाळी ४:४५ वा. च्या दरम्यान घडला. यामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीबाबत विचारणा करणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना चालकाने उद्धटपणे उत्तरे देत अरेरावी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आज सायंकाळच्या सुमारास भंडारा डेपोची भंडारा – आंभोरा बस क्र.एम एच १३ सी यु ८४१६ ही मांढळ बसस्थानकात आली असता, चालकाने बस नियोजित जागेवर उभी न करता मांढळ – नवेगाव रस्त्यावर मधोमध थांबवली. मांढळ हे महत्त्वाचे व्यापार केंद्र असल्याने येथे मोठी वर्दळ असते. तसेच शाळेला सुट्टी झाल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी अस्थायी बस स्थानकावर झाली होती, त्यातच चालकाने बस रस्त्याच्या मध्यभागी उभी केल्याने मागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास जागा उरली नाही. अवघ्या काही मिनिटांतच बसस्थानक परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे लोकांची गैरसोय होत असल्याचे पाहून काही ग्रामस्थांनी चालकाला बस रस्ता सोडून समोर लावायला लावली मात्र, चूक मान्य करण्याऐवजी चालकाने अत्यंत मुजोरपणे भाष्य करीत विद्यार्थ्यांना सांगा . मी गाडी हलवणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, ‘अशा शब्दांत चालकाने स्थानिकांशी हुज्जत घातली.

चालकाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. भंडारा डेपोच्या या चालकाच्या अरेरावीमुळे एस.टी. महामंडळाच्या प्रतिमेला तडा जात आहे. यापूर्वीही अशा तक्रारी आल्या असून, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित मुजोर चालकावर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी मांढळ येथील नागरिक व प्रवाशांनी केली आहे.
प्रतिक्रिया : ”बसस्थानक परिसरात बस चुकीच्या पद्धतीने उभी केल्याने मोठी कोंडी झाली होती. जेव्हा आम्ही चालकाला विनंती केली, तेव्हा त्याने उद्धटपणाची सीमा गाठली. महामंडळाने अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांना वेळीच आवर घालावा.” — लीलाधर धनविजय,सामाजिक कार्यकर्ता,मांढळ.







