पचखेडी गावाचा खरा स्वच्छता दूत – ‘भैय्या समर्थ’ भैय्या सारखा माणूस पचखेडी गावाला लाभला, हे गावाचे भाग्यच

पचखेडी गावाचा खरा स्वच्छता दूत – ‘भैय्या समर्थ’

भैय्या सारखा माणूस पचखेडी गावाला लाभला, हे गावाचे भाग्यच

स्वप्नील खानोरकर

कुही – आजच्या काळात एखाद्याला काम सांगितले की सर्वप्रथम पैशांची गोष्ट काढली जाते. पण पैशांचा विचार न करता, गावासाठी मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती म्हणजे पचखेडीचा खरा स्वच्छता दूत ‘भैय्या समर्थ’. हे नाव गावाच्या प्रत्येक नागरिकाला परिचित आहे. सकाळ होताच ग्रामपंचायतीची कचरा गाडी सायकल हाकत ते घराघरांतून कचरा जमा करतात. कुठे एखादा मृत प्राणी रस्त्यावर पडला असेल, त्याचे उचलून व्यवस्थितपणे विल्हेवाट लावण्याचे जबाबदारीचे कामही भैय्या कोणत्याही तक्रारीशिवाय करतात. कुणाच्या घरी कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी सर्वात आधी मुखावर नाव येते तो भैय्या. अशी त्यांची गावकऱ्यांच्या मनात खरी ओळख झाली आहे. ग्रामपंचायतीकडून मिळणारा पगार अत्यल्प असला तरी कर्तव्याशी तडजोड न करता भैय्या आपले काम प्रेमाने व निष्ठेने करतात.

जिल्हा परिषदेची शाळा असो, सार्वजनिक स्वच्छतागृहे असोत किंवा गावातील एखाद्या व्यक्तीने दिलेले छोटेसे काम भैय्या न हिचकता, अगदी घरचे काम समजून जबाबदारीने ते पार पाडतात. त्यामुळेच गावातील प्रत्येक नागरिकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर व आपुलकीची भावना आहे. गावात स्वच्छतेचा अभाव असेल तर रोग फैलतात, आरोग्य बिघडते उलट, स्वच्छतेमुळे हवा शुद्ध राहते, जलस्रोत टिकून राहतात, नागरिकांचे आरोग्य सुदृढ होते आणि गावाची ओळख स्वच्छ गाव म्हणून निर्माण होते. हे महत्त्व पटवून देण्याचे काम भैय्या आपल्या रोजच्या कामातून प्रत्यक्ष दाखवून देतात.

“स्वच्छ गाव, सुंदर गाव” हा फक्त फलकावरील नारा न राहता, तो गावकऱ्यांच्या मनात रुजविण्याचे श्रेय या मेहनती माणसाला जाते. गावातील प्रत्येक रस्त्यावरून, शाळेतून आणि शौचालयातून स्वच्छतेचा सुवास दरवळावा यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न खरोखर उल्लेखनीय आहे. आजच्या आधुनिक काळात जिथे अनेक जण स्वतःच्या घरापुढे झाडू मारायलाही टाळाटाळ करतात, तिथे भैय्या समर्थ मात्र गावाचे रूप पालटण्यासाठी घाम गाळत आहेत. भैय्या फक्त कचरा गोळा करणारे नाहीत, तर पचखेडीचे खरे स्वच्छता दूत आहेत. गावागावात असे स्वच्छता सैनिक असतील तर प्रत्येक गाव केवळ स्वच्छच नव्हे, तर आरोग्यदायी, प्रगत आणि आदर्श ठरेल, यात तिळमात्र शंका नाही.