अवैध रेती वाहतुकीचा टिप्पर पकडला
कुही पोलिसांची कारवाई
कुही :- पोलीस स्टेशन कुही हद्दीतील पाचगाव चौकी दरम्यान येणाऱ्या भागात पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी करत असताना अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. २४) कुही पोलिसांतर्फे नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करत असताना सकाळी 6.30 च्या दरम्यान एमएच ४० सीएस ९८९१ या क्रमांकाचा १२ चाकी टिप्पर येताना दिसून आला. लागलीच पोलिसांना टिप्पर थांबवून चालकास टिप्पर मधील मालाबाबत विचारणा केली असता त्याने ट्रक मध्ये रेती असल्याचे सांगितले. पोलिसांनी रेतीचा परवाना मागितला असता परवाना नसल्याचे सांगितले. लागलीच पोलिसांनी पंचांना बोलावून तपासणी केली असता ट्रक मध्ये अंदाजे 10 ब्रास रेती आढळून आली. पोलिसांनी वाहनचालकाचे नाव विचारले असता त्याने रवींद्र भीमराव धनविजय (वय ३५) रा.नांद,ता. उमरेड असे सांगितले असून मालक गणेश जुनघरे रा. उमरेड यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या उमरेड येथील अवैध रेतीसाठ्यातून रेती आणल्याचे सांगितले. पोलिसांनी टिप्पर क्र. एमएच ४० सीएस ९८९१ अंदाजे किंमत ४०,००,००० व विना परवाना 10 ब्रास रेती प्रत्येकी ६००० ब्रास प्रमाणे ६० हजार असा ४०,६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चालक व मालक दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. गजेंद्र चौधरी, हरिदास चाचरकर सह कुही पोलिसांनी केली.