नागपूर: कारचा धडकेत दुचाकीवरील 10 महिन्याचा बाळाचा मृत्यू; आई गंभीर जखमी

नागपूर: कारचा धडकेत दुचाकीवरील 10 महिन्याचा बाळाचा मृत्यू; आई गंभीर जखमी

नागपूर : दुचाकी वाहनाने घरी जात असलेल्या कुटुंबाला भरधाव कारने जबर धडक दिली. या अपघातात महिला आणि तिचा 10 महिन्यांचा बाळ गंभीर जखमी झाला. दोघांनाही उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून बाळाला मृत घोषित केले. ही दुर्दैवी घटना शांतीनगर पोलिस ठाण्यांतर्गत मेहंदीबाग रोडवर घडली.

पोलिसांनी शेख मुश्ताक शेख मोईन (वय 33, रा. आर.के आर.के. लेआऊट, माजरी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. रविवारी सुटी असल्याने मुश्ताक हे पत्नी मुस्कान अंजुम, मुलगा मिर्जान (वय 7) आणि 10 महिन्यांच्या मुनाहिद शेखसोबत शांतीनगर येथे सासरी गेले होते. जेवणानंतर रात्री 11.30 वाजताच्या सुमारास चौघेही एमएच-49/सीबी 7746 क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात होते.

दही बाजार पुलाकडून मेहंदीबागकडे जाणाऱ्या मार्गावर सतरंजीपुरा झोन कार्यालयासमोरून रस्ता ओलांडत असताना मागून एक काळ्या रंगाची कार भरधाव त्यांच्या दिशेने आली. काही कळण्यापूर्वीच कारने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि पळून गेला. मुश्ताक आणि मिर्जान किरकोळ जखमी झाले. मात्र, मुस्कान आणि मुनाहिद हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आसपासचे नागरिक मदतीला धावले. कोणीतरी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल

मुश्ताकने नागरिकांच्या मदतीने मुस्कान आणि मुनाहिद यांना मेयो रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मुनाहिदला मृत घोषित केले. मुस्कानवर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. मुस्कानला मोठा मानसिक धक्का बसला आहे. अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.