नागपूर: ‘सेक्स रॅकेट’ मध्ये अडकलेली विद्यार्थिनी पोलिसांचा मदतीने परिक्षा केंद्रावर
नागपूर : घरातील गरिबीची परिस्थिती आणि चुकीच्या मैत्रिणींची संगत लागल्यामुळे दहावीत शिकणारी मुलगी ‘सेक्स रॅकेट’ मध्ये अडकली. मनिषनगरातील एका हॉटेलमध्ये पोलिसांच्या छाप्यात ग्राहकासोबत ती सापडली. पोलिसांनी तिला ताब्यात घेत सुधारगृहात टाकले. मात्र, ती दहावीची विद्यार्थिनी असल्यामुळे पोलिसांनी तिला विशेष पोलीस वाहन आणि महिला पोलिसांच्या मदतीने नागपूर ग्रामीण भागातील परिक्षा केंद्रावर जाण्याची व्यवस्था केली. मुलीने पेपर सोडविला आणि पोलिसांनी तिला पुन्हा महिला सुधारगृहात पोहचवले. पीडित मुलीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांनी सकारात्मक पाऊल उचलले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी आशा (बदललेले नाव) नागपूर ग्रामीण भागातील रहिवाशी असून तिचे आईवडिल शेतमजूर असून तिच्यासह लहान बहिण शिक्षण घेत आहे. दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च आईवडिलांना झेपत नव्हता. आईवडिलांना थोडीफार आर्थिक मदत होईल म्हणून आशा काम शोधत होती. दरम्यान, तिचा मैत्रिणीने तिला झटपट पैसा कमविण्यासाठी नागपुरातील हॉटेलमध्ये स्वागत कक्षातील काम सूचवले. आशा आणि तिची मैत्रीण दोघीही मनिषनरातील कृष्णकुंज हॉटेलमध्ये कामाला लागल्या. यादरम्यान, हॉटेलमध्ये येणाऱ्या आंबटशौकीन ग्राहकांकडे जाऊन आशा पैसे कमावत होती.

झटपट पैसे कमविण्याचा मार्ग दाखविणाऱ्या मैत्रिणीच्या नादाला लागून आशा ‘सेक्स रॅकेट’ मध्ये अडकली. गेल्या १३ फेब्रुवारी २०२४ मध्ये मनिषनगरातील हॉटेल कृष्णकुंज येथे बेलतरोडी पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात आशाला ग्राहकासह पोलिसांनी ताब्यात घेतले. व तिची रवानगी महिला सुधारगृहात केली. या वर्षी आशा दहावीत असून गेल्या वर्षभरापासून ती सुधारगृहात अभ्यास करीत होती. दहावीच्या परिक्षेचे वेळापत्रक आले आणि बेलतरोडी पोलिसांना आशाचा शैक्षणिक नुकसानीची जाणिव झाली. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांनी वाहनाची व्यवस्था केली. महिला पोलिसांना सोबत देत आशाला परिक्षा केंद्रावर सोडले. तिचे पेपर सुरु असून महिला पोलिसांचे पथक तिला सहकार्य करीत आहे.
बेलतरोडी पोलिसांचे कौताकास्पद कार्य
मैत्रिणीच्या नादाला लागून पीडित विद्यार्थिनी सेक्स रॅकेटमध्ये अडकली. मात्र, त्या मुलीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, तिला परिक्षा केंद्रावर पोहचविण्यासाठी पोलिसांनी व्यवस्था केली बेलतरोडी पोलिसांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.


