`शादी डॉट कॉम’ वर झाली ओळख; तरुणीवर अत्त्याचार, आता लग्नास नकार  

`शादी डॉट कॉम’ वर झाली ओळख; तरुणीवर अत्त्याचार, आता लग्नास नकार  

नागपूर : ‘शादी डॉट कॉम’वरुन ओळख झाल्यानंतर तरुणीसोबत जवळपास दोन वर्षे प्रेमसंबंध ठेवल्यानंतर तिला लॉजवरुन नेऊन युवकाने बलात्कार केला. त्यानंतर युवकाने लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. नेहाल रविंद्र पाटील (३०, रा. सिद्धार्थनगर, वारीसपुरा, कामठी) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोराडी परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने ‘शादी डॉट कॉम’वर नोंदणी केली होती. १ जानेवारी २०२३ मध्ये आरोपी नेहाल पाटील यानेही ‘शादी डॉट काम’वर नोंदणी केली होती. दोघांची ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांशी संपर्क साधून लग्नाबाबत बोलणी केली. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये नेहालने तरुणीला फिरायला नेले. तो तिला थेट एका लॉजवर घेऊन गेला. तेथे तिला शितपेयातून गुंगीचे औषध दिले. तिच्यावर बलात्कार केला.तसेच अश्लील छायाचित्र आणि चित्रफित काढली. तरुणीने लग्न करण्यासाठी नेहालवर दबाव टाकला असता, ‘लग्नाचा नाद सोड…नाही तर तुझे सर्वच न्यूड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल’ अशी धमकी नेहालने तरुणीला दिली.

नेहालच्या आईवडिलांनी नातेवाईक असलेली तरुणी लग्नासाठी बघितली होती. ही बाब नेहालच्या प्रेयसीला कळाली. त्यामुळे तिने नेहालशी चर्चा केली. मात्र, त्याने तिच्याशी लग्नाबाबत बोलण्यास नकार दिला. तसेच लग्नात खोडा टाकल्यास अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणीने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन नेहालचा शोध सुरु केला आहे.