संतापलेल्या बापाने मुलीचा बॉयफ्रेण्डला किडनॅप करुन केली जबर मारहाण

संतापलेल्या बापाने मुलीचा बॉयफ्रेण्डला किडनॅप करुन केली जबर मारहाण

नागपूर : मुलीच्या प्रियकराचे अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याची घटना नागपूर येथील जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलासह चौघा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आर्यन देवेंद्र खोब्रागडे (रा. जरीपटका) याने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. बबलू व अन्य तिघे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपासून आर्यनचे बबलूच्या मुलीसोबत संबंध आहेत. याबाबत बबलूला माहीत झाले. त्याने साथीदारांच्या मदतीने आर्यनचा शोध सुरू केला. दुपारी आर्यन हा मोपेडने राजकुमार केवलरामानी शाळा परिसरात गेला. यावेळी कारने बबलू व त्याचे तीन साथीदार तेथे आले. ‘मेरे बेटी के साथ क्यू बात करता है’, असे म्हणत बबलूने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर तिघांनी त्याला बळजबरीने कारमध्ये डांबले. चौघेही त्याला घेऊन कपिलनगरमधील नारी परिसरात गेले. तेथे त्याला काठीने जबर मारहाण केली.

‘मेरी लडकी के साथ चातचित की तो तुझे काट डालूंगा, मार डालूंगा’, अशी धमकी देत त्याला सुगतनगर परिसरात सोडले व पसार झाले. आर्यनने मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर आर्यनने जरीपटका पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी मारहाण, अपहरणासह विविध कलमांच्या अन्वये बबलू व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.