प्रेयसीची हौस भागविण्यासाठी प्रेमी बनला घरफोड्या ; 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक
नागपूर : प्रेमात माणूस वेडा होऊ शकतो असं आपण ऐकलं आहे. नागपूरचा नमन पेठे नावाचा तरुण प्रेयसीच्या प्रेमात इतका वेडा झाला की तो चक्क चोरी करु लागला. त्याने साधीसुधी नाही तर घरफोडी सारखी अट्टल चोरी केली. त्याने एक किंवा दोन वेळा घरफोडी केली नाही. तर तब्बल नऊ वेळा घरफोडी करुन चोरी केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे त्याने चोरी का केली? याचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.
आपल्या प्रेयसीची हौस भागवण्यासाठी आपण घरफोड्या बनल्याचं तो निर्लज्जपणे सांगतो. तो पकडला गेला नसता तर त्याने आपली कृत्य सुरुच ठेवली असती. पण पोलिसांनी योग्यवेळी त्याच्या मुसक्या आवळल्या. आता त्याच्यासोबत इतरही कोणी आरोपी होते का? ते सुद्धा पोलीस तपासातून समोर येईल. आरोपी नमन हा पदवीच्या प्रथम वर्षाला शिकतो. १४ सप्टेंबरला बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेवतीनगर परिसरात साडेतीन लाखांची घरफोडी झाली. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध सुरू केला. पोलीस गस्तीवर असताना नमन हा विना क्रमांकाच्या मोटारसायकलने जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला पकडले.

त्याची चौकशी केली असता त्याने हुडकेश्वर बेलतरोडी, अजनी, सक्करदरा, प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ घरफोड्या केल्याचे मान्य केले. प्रेयसीची हौस भागविण्यासाठी घरफोडी करीत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नमनकडून 78 हजारांची रोख, मोबाईल, सोन्याच्या दागिन्यांसह 20 लाखांचा ऐवज जप्त केला.


