नागपूर: घरात घुसून वृद्ध नागरिकाची हत्या; परिसरात एकच खळबळ

नागपूर: घरात घुसून वृद्ध नागरिकाची हत्या; परिसरात एकच खळबळ

नागपूर : भरदिवसा घरात घुसून एका वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना कोराडी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. प्राथमिक तपासात ही हत्या चोरी किंवा लुटीच्या उद्देशाने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

पापा शिवराम मडावी (वय 65, रा. सुंदर बिस्कीट फॅक्टरीमागे, नागपूर) असे मृतकाचे नाव आहे. मडावी एका प्रेसमध्ये काम करत होते. त्यांचे दुर्गानगर येथे दोन मजली घर आहे, जिथे ते पत्नी अनिता, मुलगा श्रीकांत आणि मुलगी सोनालीसोबत राहत होते. अनिता आसपासच्या घरांमध्ये स्वयंपाकाचे काम करते. मुलगी सोनाली बुटिकमध्ये तर मुलगा श्रीकांत खासगी कंपनीत टीव्ही इंस्टॉल करण्याचे काम करतो. नेहमीप्रमाणे मंगळवारीही कुटुंबातील तिन्ही सदस्य आपआपल्या कामावर गेले होते. मडावी घरात एकटे होते.

सायंकाळी मुलगा श्रीकांत घरी पोहोचला असता त्याला पहिल्या मजल्यावरील खोलीत वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. श्रीकांतने घटनेची माहिती पोलिसांना दिली. कोराडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रविण पांडे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्वरित डॉग स्क्वाड आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. परंतु कोणताही महत्त्वाचा पुरावा मिळालेला नाही. सध्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी सुरू असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, मडावी यांचे कोणाशीही वैयक्तिक शत्रुत्व नव्हते. त्यामुळे त्यांची हत्या ही लुटीच्या उद्देशानेच झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या हत्येचा नेमका उद्देश काय होता. याचा शोध पोलिस घेत आहेत. हत्या करणारा आरोपी कोण? लूटीचा कट की काही वेगळे कारण? याचा उलगडा लवकरच होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.