नागपुरात ‘आपली बस’ सेवा ठप्प ; कर्मचारी संपावर
नागपूर: शहरात धावणाऱ्या महानगरपालिकेच्या ‘आपली बस’च्या चालकांनी वाढीव वेतनाच्या थकबाकीसाठी बुधवारी संप पुकारल्याने शहर बससेवा ठप्प झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. ऑटोरिक्षा चालकांनी मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. महाराष्ट्र सरकारने किमान वेतनात सुधारणा केली आहे. त्यानुसार चालक, वाहकांना वेतन देणे अपेक्षित आहे. परंतु वाढीव वेतनाची थकबाकी गेल्या साडेचार महिन्यांपासून देण्यात आली नव्हती. चालक, वाहक संघटनांनी महानगरपालिकेला मंगळवारी संपाचा इशारा दिला होता. परंतु प्रशासनाने ते गांर्भीयाने घेतले नाही. त्यामुळे आज चालक, वाहक संपावर केले. त्यामुळे शाळकरी मुले, चाकरमान्यांना ऑटोरिक्षाने शाळा, कार्यालय गाठावे लागले आणि घरी परतावे लागले. तर काहींनी मेट्रोने प्रवास केला.
राज्याच्या उद्योग, कामगार आणि खाण विभागाने चालक आणि वाहकांसाठी किमान वेतनात सुधारणा करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्याचा अंमलबजावणीसाठी गेल्या ऑक्टोबरमध्ये आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर वाढीव वेतन देण्याची मागणी मान्य करण्यात आली. प्रत्यक्षात वाढीव वेतन देण्यात आले नाही. गेल्या साडेचार महिन्यांपासून वाढीव वेतनाची थकबागी होती. शासकीय निर्णयानुसार राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वर्ग अ आणि वर्ग ब महापालिकांमध्ये विभागले गेले आहे. वर्ग अ महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या चालकांना १९,६२५ पगार मिळेल, तर वर्ग ब अंतर्गत येणाऱ्या चालकांना १८,९७५ पगार मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे. प्रशासन आणि बस सेवा देत असलेले कंत्राटदार (ऑपरेटर) यापैकी कोणी थकबाकी द्यावी, असा पेच होता. त्यासाठी ऑपरेटर आधी महापालिकेने थकबाकी देईल आणि त्यानंतर महापालिका वाहक, चालकांना ती देईल असे ठरले आहे.

२०१५ च्या जीआरनुसार, किमान वेतन १५,००० रुपये निश्चित करण्यात आले होते. पाच वर्षांनंतर जीआरमध्ये बदल केल्यानंतर, २०२० च्या जीआरमध्ये किमान वेतन (मूलभूत) १८,००० रुपये करण्यात आले. या नवीन चौकटीनुसार, चालकांना सुमारे २२,००० रुपये आणि कंडक्टरना सुमारे २०,००० रुपये मिळायला हवे होते, परंतु प्रत्यक्षात, चालक आणि कंडक्टरना फक्त १२,००० ते १४,००० रुपये मिळत होते. नवीन जीआरमध्ये, मूळ वेतनात १,००० रुपयांचीही वाढ झालेली नाही.


