कुही तालुक्यात घरकूल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार ; 10 जून पर्यंत विनारॉयल्टी 5 ब्रास रेती वाटपाची सुविधा

कुही तालुक्यात घरकूल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार ; 10 जून पर्यंत विनारॉयल्टी 5 ब्रास रेती वाटपाची सुविधा

स्वप्नील खानोरकर(विशेष प्रतिनिधी)                                                                                                                कुही :- शासनाच्या विविध घरकूल योजनांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या घरबांधणीसाठी आता वाळू स्वामित्वधन (रॉयल्टी) न आकारता दिली जाणार आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाच्या 28 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

या अधिसूचनेनुसार, जे वाळूगट लिलावात गेलेले नाहीत किंवा ज्यांना पर्यावरण परवानगी मिळालेली आहे, तसेच शासनाने जप्त केलेली वाळू अशा ठिकाणांहून पात्र घरकूल लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी जास्तीत जास्त 5 ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. ही वाळू लाभार्थ्यांना त्यांच्या गावाजवळील अधिकृत वाळूगटातूनच देण्यात येईल. गटविकास अधिकारी यांच्याकडून लाभार्थ्यांची यादी तहसिल कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर तहसिलदार कार्यालयामार्फत ऑनलाइन पास देण्यात येतील. कुही तालुक्यात ही सुविधा दिनांक 10 जून 2025 पर्यंत उपलब्ध असेल. वाळू वाटप वेळ सकाळी 6.00 ते सायंकाळी 6.00 दरम्यान राहील. मात्र वाळू उपसताना कोणतीही यंत्रसामुग्री वापरता येणार नाही. केवळ मनुष्यबळाच्या सहाय्यानेच वाळू उपसावी लागेल.

कुही तालुक्यातील सर्व पात्र घरकूल लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याची सूचना तहसिल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हा निर्णय घरकूल बांधणीसाठी मदतीचा हात असून शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सकारात्मक टप्पा आहे. योग्य कागदपत्रांसह आणि नियमांचे पालन करत लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.