कारची अज्ञात वाहनासोबत जबर धडक ; कारचा चेंदामेंदा तर कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कारची अज्ञात वाहनासोबत जबर धडक 

कारचा चेंदामेंदा तर कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कुही:- उमरेड-नागपूर मुख्य मार्गावर उटी शिवारात कार व अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात कारचालक युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून धडक झालेले दुसरे वाहन अपघात होताच पसार झाले आहे.
गेल्या आठवडाभरात अपघाताचे जणू सत्रच सुरू आहे.त्यात सोमवारी (दि.26 मे) रात्री 11.20 मिनिटांच्या सुमारास उमरेड-नागपूर मुख्य मार्गावर उटी शिवारात उमरेडच्या दिशेने जाणाऱ्या शिफ्ट डिझायर कार क्र. एमएच 36 एच 4878 या कारची एका अज्ञात वाहनासोबत जबर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.यात कारमधील कारचालक अनिकेत अरविंद गभने, रा.पवनी, जि.भंडारा  हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ नागपूर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.विशेष म्हणजे धडक झालेले दुसरे वाहन अपघात होताच पसार झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप लांजेवार करीत आहेत.
मृतक अनिकेत गभने हा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील प्रसिद्ध डॉ.अरविंद गभने यांचा मुलगा असून त्याची आई व पत्नी या सुद्धा डॉक्टर आहेत. अनिकेत हा व्यावसायिक असून नागपूर येथे एका कार्यक्रमासाठी आला होता. व रात्री कार्यक्रम आटोपून गावी पवनी येथे त्याच्या कार ने परत जात असताना त्याचा उटी शिवारात त्याच्या कारचा अपघात झाला. त्यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच अनिकेतचे लग्न झाले असून त्याच्या मृत्यूने पवनी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.