शेळी राखत असताना विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
कुही:- अचानक आलेल्या वादळ व पावसात शेतशिवारात शेळ्या चारत असलेल्या इसमाचा वीज पडून विजेच्या जबर धक्क्याने मृत्यू झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात मंगळवारी 3.30 च्या दरम्यान तालुक्यातील बहुतांशी भागात वादळ वाऱ्यासह विजगर्जना सुरू होती. दरम्यान तालुक्यातील मौजा-भामेवाडा शेतशिवारात शेळ्या चारत असलेल्या प्रकाश दौलत गजभिये (वय-70) यांचा वीज पडून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. शेतातील कामे सुरू असल्याने काही शेतकरी शेतातच होते. प्रकाश गजभिये हे पडलेल्या अवस्थेत बाजूच्या शेतकऱ्यांला दिसून आल्याने त्यांनी इतरांना याची माहिती देत प्रकाश यांना तात्काळ कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्रकाश यांना तपासून मृत घोषित केले आहे. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे व मनीषा देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली आहे.


