वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी ; परिसरात दहशतीचे वातावरण
कुही:- कऱ्हाडला – उमरेड अभयारण्य लगत असलेल्या धामना येथील मोठा तलाव शेजारी गुरे चारीत असताना अचानक दडी मारून असलेल्या वाघाने गुरख्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवार दि.२७ जून २०२५ ला सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.
जखमी गुराख्याचे नाव संतोष मांढरे (वय ५३)रा.धामना असे आहे.नेहमीप्रमाणे संतोष मांढरे हा आपली गुरे घेऊन गावातील अभयारण्याला लागून असलेल्या मोठा तलाव परिसरात चारायला गेला होता.गुरे चरत होती.सायंकाळी गुरे घेऊन घराकडे परत येण्याच्या वेळेस तलाव परिसरात दडी मारून असलेल्या वाघाने अचानक गुरख्यावर हल्ला चढविला.त्याच्या डोक्याच्या भागाला जबर मार लागला आहे.त्यामुळे तो बेशुद्धावस्थेत होता. वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्राधिकारी आरती उके,वन अधिकारी शरद तांबे व इतर कर्मचारी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी व माजी प.स.सदस्य देवानंद गवळी व इतरांनी त्याला मांढळ येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूर येथील मेडिकल इस्पितळात पाठविण्यात आले.


