अश्लील चॅट करुन 25 वर्षीय तरुणाकडून 50 लाख उकळले ; पण ‘ती’ निघाला ‘तो’!
नागपूर : सोनेगावातील 25 वर्षीय युवकाला सेक्स्टॉर्शनमध्ये अडकवून 50 लाखांनी गंडा घातल्या प्रकरणात सायबर पोलिसांनी बिहारच्या युवकाला अटक केली आहे. सुंदरकुमार कुंदनकुमार सिंग, वय 20 वर्ष, रा. पूर्णिया, असे अटकेतील युवकाचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे आरोपी दहावी नापास असूनही, तो इंटरनेटच्या वापरात इतका पारंगत आहे की अशा गुन्ह्यांची योजनाबद्ध आखणी करत होता.
जानेवारी महिन्यात पीडित तरुणाला एका अनोळखी युवतीने व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून संवाद साधण्यास सुरुवात केली. तिने स्वतःला दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी म्हणून सादर करत पीडित तरुणाचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संभाषण झाले आणि काही दिवसांतच अश्लील चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर आरोपीने बनावट युवतीच्या नावाने अश्लील फोटो व व्हिडिओ शेअर करून पीडित तरुणा कडून देखील असेच फोटो पाठवण्यास सांगितले. जेव्हा पीडिताने असे फोटो शेअर केले, त्यानंतर त्याचा वापर करून ब्लॅकमेलिंग सुरू झाली. युवक एका बड्या कंपनीत काम करतो. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने वेळोवळी युवकाकडून 49 लाख 34 हजार 286 रुपये उकळले.

फसवणूक झाल्याने युवकाने सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 4 मे रोजी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराच्या विरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या न्वये गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला सुंदरकुमार या रॅकेटचा सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांचे पथक बिहारला गेले. सुंदरकुमारला अटक करून नागपुरात आणले. त्याच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

