बँकेचे कर्ज, आर्थिक परिस्थिती बिकट ; तरुण शेतकऱ्याने कीटकनाशक घेत मृत्यूला कवटाळलं
नागपूर : जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील केरडी गावामध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावातील एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. कृष्णा तुकाराम वानखेडे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
कृष्णा वानखेडे यांनी आपल्या वडिलांच्या नावावरून बँकेकडून सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, शेतीमधून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते कर्ज फेडणे कठीण झाले. त्यामुळे कर्जफेडीच्या तगाद्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या कृष्णाने इतर नातेवाइकांकडून तसेच दुसऱ्या बँकेकडून आणखी १ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले. एकूण ४ लाख रुपयांहून अधिक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कृष्णा वानखेडे यांच्यावर कौटुंबिक आर्थिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. शेतीमधील तोट्यामुळे आणि कर्जफेडीच्या अडचणींमुळे त्यांनी घरातच शेतीसाठी वापरले जाणारे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. कृष्णा यांना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कन्हान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

कृष्णा वानखेडे यांच्या आत्महत्येमुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कृषी अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, उत्पन्नातील अनिश्चितता आणि वाढते कर्ज या गोष्टी ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांचे जीवन संकटात टाकत आहेत. गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून, शासनाने अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


