चापेगडी येथे करंट लागून बैलाचा मृत्यू; नुकसानभरपाईची मागणी

चापेगडी येथे करंट लागून बैलाचा मृत्यू; नुकसानभरपाईची मागणी

स्वप्नील खानोरकर 

कुही: तालुक्यातील चापेगडी गावात शनिवार (२६ जुलै) रोजी रात्रीच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. मुरलीधर  तळेकर रा. चापेगडी  या शेतकऱ्याच्या घराजवळील सिमेंटच्या वीज पोलला करंट असल्याने त्यांच्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे ७५,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

तळेकर  त्यांच्या घरासमोरील अंगणात गाई-बैल बांधण्याची जागा असून, त्याच परिसरात सिमेंटचा वीजेचा एक पोल आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी बैलांना गोठ्यात बांधण्यासाठी हलवले असता, एक तीन वर्षांचा पांढऱ्या रंगाचा बैल पोलाजवळ जाताच अचानक त्याला करंट लागला त्यामुळे बैलाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.शेतकरी तळेकर यांनी सांगितले की हा बैल शेतीच्या कामासाठी अत्यंत उपयुक्त होता. त्याच्या मृत्युमुळे माझ्यावर आर्थिक भार पडला आहे. नुकसानभरपाई मिळावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी.