भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीचे थैमान ; सर्वत्र जनजीवन विस्कळीत
भंडारा : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाने मुसंडी मारली आहे. दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात व लगतच्या प्रदेशात अतिवृष्टी होत असल्याने नदी-नाले उफाळून वाहत आहेत. वैनगंगा नदी फुगल्याने गोसे धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी गोसे धरणाचे ३३ वक्रद्वार अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून धरणातून ३६५६ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ९ रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडलेली आहे. तर रखडलेल्या रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दि.२५ जुलै रोजी तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यात रेड अलर्ट घोषीत केला होता. जिल्हा प्रशासनाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मुसळधार व अति मुसळधार पावसाचा अंदाजावरून अनुचित घटना टाळण्याच्या दृष्टीने शाळांना सुटी जाहीर केली होती. २५ जुलै रोजी पावसाचा जोर पाहिजे तसा दिसून आला नाही. मात्र २६ जुलै रोजी सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावत दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. जिल्ह्यात व लगतच्या प्रदेशात पाऊस कोसळत असल्याने नदीनाले उफाळून वाहत आहेत. तसेच धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोसे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने धरणाचे ३३ वक्रद्वार अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून धरणातून ३६५६ क्यूमेक्स पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडला जात आहे. वैनगंगा फुगल्यामुळे वैनगंगेला जोडणार्या नदीनाल्यांना बॅकवाटरचा फटका बसत असल्याने भंडारा तालुक्यातील खमारी नाल्यावरील पूल पाण्याखाली सापडला आहे. तसेच सालेहेटी ते माटोरा व कारधा लहान पूल वाहतुकीसाठी बंद आहे.

साकोली तालुक्यात दोन दिवसांपासून अतिवृष्टीने थैमान घातल्याने तालुक्यातील ५ रस्ते वाहतुकीसाठी बंद पडले आहेत. यामध्ये विर्शी-उकारा, चिंगी-खोबा, गिरोला-बोंडे, सराटी-चिचगाव, न्याहारवाणी ते कटंगधरा, तसेच लाखनी तालुक्यातील मिरेगाव-सोनमाळा हा रस्ता बंद पडला आहे. आठवडाभरापासून पावसाने विश्रांती दिल्याने कोरडवाहू शेतजमिनीमधील रोवणी पाण्याअभावी खोळंबली होती. पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धान रोवणीला गती मिळाली असून सध्यातरी शेतकरी सुखावला आहे. दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे मात्र काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून काही गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्क असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
