पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मूकबधिर मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मूकबधिर मुलाचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर : काटोल तालुक्यातील खानगाव येथे मंगळवारी सकाळी घडलेली घटना परिसराला हादरवून गेली. नगरपरिषदेच्या डम्पिंग साइटवरील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मूकबधिर विराट राणा पवार याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

काटोल नगरपरिषदेने कचरा डम्पिंगसाठी मोठमोठे खड्डे खोदले होते. मात्र, त्यांची सुरक्षितता किंवा योग्य देखरेख केली नव्हती. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि परिसर धोकादायक बनला. याच खड्ड्यात पडून विराटचा जीव गेला. अपंगत्वामुळे आधीच संघर्षमय जीवन जगणाऱ्या या मुलाच्या मृत्यूने कुटुंबाचे दुःख पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून या खड्ड्यांना बुजवण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिले, पण फक्त आश्वासने मिळाली. अखेर या निष्काळजीपणामुळे एका निरागस जीवाचा बळी गेला.

नागरिकांनी नगरपरिषद आणि डम्पिंग कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकणााचा प्राथमिक तपास सुरू असला तरी पारधी समाजाचा आग्रह आहे की, “ही केवळ चौकशीपुरती मर्यादित राहू नये. दोषींना शिक्षा झाली पाहिजे आणि धोकादायक खड्डे तात्काळ बुजवले गेले पाहिजेत.”