नागपूर: डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर बहीण भावाने थाटला बोगस दवाखाना, अखेर बिंग फुटलं

नागपूर: डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर बहीण भावाने थाटला बोगस दवाखाना, अखेर बिंग फुटलं

नागपूर: डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर बहीण भावाने चक्क बोगस दवाखाना थाटल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. नागपूर शहरतील अन्सारनगर मधील हे प्रकरण असून या प्रकाराचा भंडाफोड होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नसताना भाऊ-बहीण दवाखाना चालवत होते. दरम्यान, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर तहसील पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई करत या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील अन्सारनगर परिसरात डॉक्टर साजिद अन्सारी हे क्लिनिक चालवायचे. मात्र त्यांचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे साजिद अन्सारी यांच्या मृत्यूनंतर 23 वर्षीय मुलगा जैद अन्सारी आणि बहीण समन अन्सारी हे क्लिनिक चालवत होते. मात्र हा दवाखाना चालवत असताना त्यांनी कुठलेही वैद्यकीय शिक्षण न घेता या क्लिनिकमध्ये  दोन शिफ्ट मध्ये रुग्णावर उपचार करत होते. या अवैध क्लिनिकमध्ये बीपी मशीनसह वैद्यकीय साहित्य ही ठेवले होते. सोबतच इंजेक्शन, औषधे, सलाईन देखील आढळून आली आहे.

घटनेची माहिती मिळाताच महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर तहसील पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई करत या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.  मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याच्या कृत्याने वैद्यकीय क्षेत्रातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.