गुन्हा दाखल न करण्यासाठी तीस हजाराची मागणी; लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

गुन्हा दाखल न करण्यासाठी तीस हजाराची मागणी; लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

नागपुर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे नागपूर शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली होती. रविंद्र साखरे असे लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकचे नाव आहे. हा अधिकारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या तक्रारीची चौकशी सुरू होती. हा तपास आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र साखरे यांच्याकडे होता. दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साखरे यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 30,000 रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम निश्चित झाली. मात्र, संबंधित युवकाने लाच देण्यास नकार देत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने साखरेला पकडण्यासाठी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, तक्रारदाराकडून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र साखरे यांनी 30,000 रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकून त्यांना रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपी अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.