धावत्या स्कॉर्पियोला अचानक भीषण आग : चालकाच्या सतर्कतेने ८ महिला प्रवासी सुखरूप ; साहित्य जळून खाक
कुही : तालुक्यातील वग – विरखंडी मार्गावर बुधवारी रात्री घडलेल्या भीषण घटनेत धावती स्कॉर्पियो (एमएच १२ एलव्ही २१२५) गाडी अचानक पेट घेऊन पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असून वाहनातील आठही महिला प्रवासी सुखरूप बाहेर पडल्या.
ऋषीपंचमी निमित्त माहूरगड येथे देवदर्शनासाठी महिलांचा गट या गाडीतून जात होता. रात्री ९.४० च्या सुमारास विरखंडी नदीजवळ अचानक वाहनातून धूर व ज्वाळा बाहेर पडू लागल्या. मागून येणाऱ्या गाडीचालकाने दिलेल्या इशाऱ्यामुळे सतर्क झालेल्या चालकाने गाडी ताबडतोब थांबवली व सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. काही क्षणांतच संपूर्ण वाहनाने पेट घेतला. यात भांडे, पाण्याची कॅन, तांदूळ, भाजीपाला, कपड्यांच्या बॅगा, मोबाईल यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले. वाहनमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी प्रवाशांचा जीव वाचला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर माहूरगडला जाणाऱ्या भाविकांना मोठा धक्का बसला आहे.



