सर्पदंशाने बकऱ्या चारणाऱ्या इसमाचा मृत्यू
उपचारापूर्वीच मृत्यू
कुही :- तालुक्यातील आकोली शेत शिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या इसमाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या वेळेत घडली.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, रामचंद्र महादेव भानारकर (वय ६०), रा. आकोली हे दररोजप्रमाणे आपल्या बकऱ्या गावाशेजारील आकोली शिवारात घेऊन गेले होते. दुपारच्या सुमारास ते मनोज गाढवे यांच्या शेतानजिक बकऱ्या चारत असताना अचानक त्यांच्या डाव्या पायाच्या घोटीच्या खाली विषारी सापाने त्यांना दंश केला. व ते तेथेच बेशुद्ध होऊन पडले. त्यांच्या सोबत बकर्या चारत असलेल्या महेश राघोर्ते याने याची माहिती मृतक रामचंद्र यांच्या जावयाला दिली. लागलीच जावई हे घटनास्थळी पोहचून रामचंद्र यांना घेऊन कुही येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले. तेथील डॉक्टरांनी रामचंद्र यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


