कंटेनर चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू : टोल वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला
नागपूर : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी-मंगरुळ पांदण रस्त्यावर दुपारी सव्वा एकच्या सुमारास भीषण घटना घडली. टोलनाका वाचवण्यासाठी कंटेनर ट्रक पांदण रस्त्याने जात असताना 11 हजार व्होल्टच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने चालकाचा जागीच मृत्यू झाला.
राजेशकुमार रामसुदर्शन यादव (वय ३१, रा. पिडारीया, पोस्ट बिझवली, ता. हनुमाना, जि. रिवा, मध्य प्रदेश) असे मृतक ट्रकचालकाचे नाव आहे. तो सिंगल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या (एनएल-०१/एन-८१९३) कंटेनर ट्रकवर कार्यरत होता. चालक चौदामैल येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी राखड घेऊन आला होता. मात्र, टोलनाका वाचवण्यासाठी परतीच्या वेळी मंगरुळ-गोंडखैरी पांदण रस्त्याने जात असताना गोंडखैरी शिवारातील अग्रवाल यांच्या शेताजवळ ट्रकचा वरील भाग विद्युत तारेस स्पर्श झाला आणि ही दुर्घटना घडली. त्यात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी धावले आणि विद्युत विभागाला कळवून वीजपुरवठा बंद करण्यात आला. कळमेश्वर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतकाच्या मोबाईलवरील संपर्क क्रमांकावरून ट्रान्सपोर्ट मालकाला कळविण्यात आले. त्यानंतर तो घटनास्थळी दाखल झाला आणि मृतकाची ओळख पटली. या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे.


