पावसामुळे झाडाखाली थांबले ; वीज पडून मायलेकासह महिलेचा जागीच मृत्यू

पावसामुळे झाडाखाली थांबले ; वीज पडून मायलेकासह महिलेचा जागीच मृत्यू

नागपूर : शेतात काम करताना वीज कोसळून मायलेकासह तीन जण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना आज बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मडसावंगी परिसरात घडली. वंदना प्रकाश पाटील (वय ४२), त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील (वय २२) व श्रमिक महिला निर्मला रामचंद्र पराते (वय ६३) सर्व रा.धापेवाडा, अशी मृतकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वंदना, ओम व निर्मला हे तिघे शेतात काम करीत होते. अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी तिघेही शेतातील एका झाडाखाली गेले. याचदरम्यान वीज कोसळली. होरपळून तिघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. शेजारील शेतात काम करणाऱ्या श्रमिकांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. एका ग्रामस्थाने सावनेर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी तिघांचेही मृतदेह सावनेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

गेल्यावर्षी ओम याचे वडील प्रकाश यांना बैलाने लाथ मारली. त्यामुळे ते जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश यांच्या मृत्यूनंतर पाटील मायलेक दोन एकर शेती करून उदरनिर्वाह करायचे. वंदना व ओमच्या मृत्यूने ओमची बहीण संस्कृतीचे (वय १४) मातृछत्र हरवले आहे. आई व भावाच्या मृत्यूने ती जबर धक्क्यात आहे.