कुंभमेळ्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी; अनेकांचा मृत्यू, जखमींची संख्याही जास्तच.

कुंभमेळ्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी; अनेकांचा मृत्यू, जखमींची संख्याही जास्तच; पंतप्रधानांचा योगी आदित्यनाथ यांना फोन

दर्शनासाठी, पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी कमी होत नसल्याचे दिसत आहे. देश-विदेशातील नागरिकांसह भारतातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविक प्रयागराज येथे उपस्थित आहेत.

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे. यामध्ये कोट्यवधी भाविकांची उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दर्शनासाठी, पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी कमी होत नसल्याचे दिसत आहे. देश-विदेशातील नागरिकांसह भारतातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविक प्रयागराज येथे उपस्थित आहेत. असे असतानाच या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती दिली जात आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून, जखमींची संख्याही जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत लखनौपासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी महाकुंभातील परिस्थितीचा आढावा घेतला असून, आवश्यक त्या सूचना देखील केल्या आहेत. दरम्यान, अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वाशन दिले आहे.

दरम्यान, महाकुंभ मेळा चेंगराचेंगरीत काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र, मृतांचा आकडा अद्यापही प्रशासनाने जाहीर केलेला नाही. महाकुंभमेळा प्रशासनाच्या स्थितीवर लक्ष आहे. दरम्यान, आखाडा परिषदेने अमृतस्नान रद्द केल्याची घोषणा केली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मध्यरात्री एकच्या सुमारास घडली घटना

महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

भाविकांनी गर्दी करणे टाळावे; प्रशासनाचे आवाहन

महाकुंभात होणारी भाविकांची मोठी गर्दी पाहता मेळाव्याच्या अधिकाऱ्याने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. मेळा पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व आखाड्यांशी चर्चा सुरू आहे. अमृतस्नानाची वेळ काही काळानंतर निश्चित होऊ शकते. आखाड्यांनी स्नान करावे अशी आमची इच्छा आहे, पदाधिकारी त्यांची व्यवस्था करत आहेत. आखाड्याच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. सर्व बॅरल ब्रिज आणि बॅरिकेड्स उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगम नाक्यावर गर्दी जमू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.