भूमी अभिलेख कर्मचारी बेमुदत संपावर ; कुही तालुक्यातील मोजणीची कामे ठप्प 

भूमी अभिलेख कर्मचारी बेमुदत संपावर 
तालुक्यातील मोजणीची कामे ठप्प 
कुही :- विदर्भातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी 26 मे पासून तांत्रिक वेतन श्रेणी व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. अमरावती व नागपूर विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाल्यामुळे मोजणी व अन्य दैनंदिन कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला आहे. याची झळ कुही तालुक्यालाही पडली असून कार्यालय रिकामे दिसून आले तर नागरिकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
पुणे विभागातील कर्मचारी यांनी 15 मे पासूनच आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले असून त्या विभागातील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. आता विदर्भातही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून 26 मे पासून विदर्भातील कर्मचारी संपावर आहेत. त्या संपाला कुही येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्माचार्यानीही पाठींबा दिला आहे. परिणामी गेल्या 3 दिवसांपासून  भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक पेंदे हेच एकमेव कार्यालयात उपस्थित असल्याने त्यांचा पुढे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर कार्यालयातील इतर सर्व कर्मचारी संपात असल्याने भूमिअभिलेख कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला आहे.जमिनीची मोजणी करून हद्द्कायम करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फार्म भरून दोन ते तीन महिने मोजणीची वाट पाहणाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. त्यात आगामी पावसाळ्याचे दिवस पाहता लवकर लवकर मोजनी आटोपून हद्द कायम होईल असे वाटत असताना संपाच्या कालावधीत मोजणी असणाऱ्यांना आता पुढच्या तारखा मिळणार आहेत.
विशेष म्हणजे भूमी अभिलेख विभागाशी ग्रामीण भागातील नागरिकांच्या अत्यंत जवळचा संबंध येतो. शेती , प्लॉट या खरेदी, विक्री व्यवहारासाठी भूमी अभिलेख विभागातील अभिलेखांची, प्रमाणपत्रांची गरज सर्वत्र पडते. या विभागात मुख्यत्वे जमिनीचे रेकॉर्ड (अभिलेख) व्यवस्थापित करण्याचे काम करते. या जमिनीचे मोजमाप , फेरफार (जसे की जमीन हस्तांतरण) सातबारा आणि इतर भूमी संबंधित नोंदी ठेवणे ही कामे समाविष्ट आहे. या विभागाचे काम जमिनीच्या मालकीची नोंद ठेवणे, वाद मिटवणे आणि शासनाच्या भूमी संबंधित योजनांसाठी आवश्यक माहिती पुरवणे आहे. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संपाचे  हत्यार  उगारल्याने  राज्यातील जमिनी संदर्भातील कामावर  परिणाम पडला आहे. त्याची झड कुही तालुक्यातील नागरिकांनाही पडल्याचे दिसून आले.