कुही तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरु
कुही :- तालुक्यातील एकही रेतीघाटाचा लिलाव न झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना रेतीची मोठी समस्या निर्माण झाली होती.घरकुल लाभार्थ्यांना रेती अभावी बांधकाम थांबल्याने शासनाने घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. नुकतेच शासन स्तरावरून तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत रेतीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आज कुही येथील तहसीलदार विकास बिक्कड यांनी पात्र लाभार्थ्यांना महसूल यंत्रणेमार्फत ठरवून दिलेल्या रेती घाटातून रेती उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले आहे.
शासन निर्णयाप्रमाणे निश्चित केलेल्या वाळू घाटातून तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याची मोहीम शासनाने घेतली त्या मोहिमेचा शुभारंभ आज दिनांक २९ मे रोजी कुही चे तहसीलदार विकास बिक्कड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शासनाच्या नव्या वाळू धोरणानुसार तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र शासन निर्णय पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपल्यावरही अंमलात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील असंख्य घरकुल लाभार्थ्यांना रेती अभावी घरकुल बांधकाम करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता. घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होत नसल्याने मोफत वाळू धोरणाची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडताच शासनाच्या निर्णयाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून कुही तालुक्यातील मांढळ, विरखंडी, पचखेडी, शिवनी,बोरी, सदाचार, राजोला आणी इतर काही ठिकाणावरून वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. या पैकी विरखंडी , चन्ना येथील घाटांवरून रेती वाटप चालू झाले आहे. तर कान्हेरी खुर्द सारख्या काही ठिकाणावरून वाटप चालू होऊन सुद्धा लाभार्थी आले नाहीत त्यामुळे वाटप होऊ शकलेले नाही.

या मोहिमेचा जास्तीत जास्त तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार विकास बिक्कड, नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे, नायब तहसीलदार मनीषा देशमुख यांनी केले आहे.
(टीप- जर आपण पत्रकार असाल तर कृपया आपल्या बुद्धिमत्तेने बातमी लिहा. कॉपी पेस्ट करून तुमच्यामधील कमतरता दाखवू नका.)

