बोगस एचटीबीटी बियाण्यांसह बोगस रासायनिक खते व कीटकनाशकाच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्याच्या मागणीसाठी कुही तालुका एग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे एक दिवसीय सांकेतिक बंद
कुही :- तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस अनधिकृत एचटीबीटी बियाणांची विक्री होत असून त्याच्याच पाठोपाठ अनधिकृत पद्धतीने खते व कीटकनाशकांची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठी फसवणूक होत असून लिंकिंग मुळेही शेतकऱ्यांचेच शोषण होत आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध लाऊन कडक कारवाई करावी या मागणीसाठी कुही तालुका एग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे एक दिवसीय सांकेतिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती असोसिएशन ने मांढळ येथील तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली आहे.
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून सोयाबीन पेरणीसह कापूस लागवडीने वेग धरला आहे. मात्र याचाच फायदा घेत राज्यात बंदी असलेल्या अनधिकृत एचटीबीटी बियाणांची विक्री करणारी टोळी तालुक्यात सक्रीय झाली आहे. थेट शेतकऱ्यांशी भेट घेत मोठ्या वाढीव दरात घरपोच हे बियाणे पोहोचविल्या जाते. यात कुठलेही अधिकृत बिल दिले जात नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांची यात फसवणूक होते. कारण अनेकदा एचटीबीटी बियाणांच्या नावावर बीटी बियाणांची विक्री केली जाते. परिणामी तणनाशके फवारणी करताच अनेकांचे पीकही मरते. तर काही ठिकाणी या झाडांची वाढ झाल्यावर या झाडांची उत्पादन क्षमता नसल्याने शेतकर्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतो. मात्र सदर बियाणेच प्रतिबंधित असून याचे कुठलेच बिल नसल्याने शेतकरी याची तक्रारही करू शकत नाही अथवा यावर कुठेच उघडपणे बोलले जात नाही. तर याच पद्धतीने कीटकनाशक व खतांची विक्री गावखेड्यात एजंटद्वारे केली जाते. मात्र हे कीटकनाशक व खते यांना शासनाची कुठलीही मान्यता नसून यांत नमूद घटकांचा उल्लेख सुद्धा नसतो. मात्र शेतकर्यांना विश्वासात घेऊन त्यांची दिशाभूल करत त्यांची पिळवणूक करण्याच्या गोरखधंदा आज खेडोपाडी सुरु आहे.यावर प्रतिबंध लागावा यासाठी कुही तालुका एग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे येत्या ३० जून रोजी एक दिवसीय सांकेतिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती असोसिएशन तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत तालुका असोसिएशनचे अध्यक्ष राजीव बुढ्ढे, सचिव गिरीश पटेल, सहसचिव नीलकंठ ठाकरे,उपाध्यक्ष परमानंद तुमसरे, ओमदेव ढेंगे, योगेश गाढवे, सतीश गोंदेवार, विजय कडव, धम्मपाल नारनवरे, जितेंद्र लुटे ,अजय निरगुळकर,प्रदीप कुलरकर,यशवंता गिरडकर आदी उपस्थित होते.
लिंकिंगचा फटका शेतकर्यांनाच
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणावर खतांची मागणी वाढली आहे. मात्र यात लिंकिंग मुळे सर्वाधिक वापरल्या जाणार्या युरिया , डीएपी सारख्या खतांवर दुसरे व औषधी घेण्यास भाग पडले जात आहे. यात गरज नसतानाही दुसरे खते घ्यावे लागल्याने याचा आर्थिक फटका शेतकर्यांना बसतो आहे. एकीकडे कृषी विभागातर्फे या पद्धतीने खते घेण्यास नकार द्या असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. मात्र दुसरीकडे कृषी केंद्र दुकानदार यांना हि खते लिंकिंगद्वारेच उपलब्ध होत असल्याने या लिंकिंग द्वारे मिळत असलेल्या खतांचा व औषधींचे करायचा काय असा सवाल दुकानदारांना पडला आहे. तेव्हा हि लिंकिंग प्रक्रियाच पूर्णता बंद करण्याची मागणीही या सांकेतिक बंद च्या माध्यमातून शासनाकडे केली जाणार असल्याची माहिती कुही तालुका एग्रो डीलर्स असोसिएशन ने पत्रकार परिषदेत दिली आहे.

