रॅगिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या आयुर्वेद कॉलेजातील 19 विद्यार्थिनींची वसतिगृहातून हकालपट्टी

रॅगिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या आयुर्वेद कॉलेजातील 19 विद्यार्थिनींची वसतिगृहातून हकालपट्टी

नागपूर : शासकीय आयुर्वेद कॉलेज आणि रुग्णालयाच्या मुलींच्या वसतिगृहातून द्वितीय वर्षाच्या १९ विद्यार्थिनींची रॅगिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर तीन महिन्यांसाठी हकालपट्टी करण्यात आली. कॉलेजच्या रॅगिंग विरोधी समितीने केलेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रॅगिंगच्या घटना रात्री उशिरा घडत होत्या आणि कर्मचाऱ्यांच्या नजरेतून सुटत होत्या असे तक्रारीत नमुद करण्यात आले होते.

तक्रारींवर कारवाई करत कॉलेजने १८ डिसेंबर रोजी चौकशी समिती गठित केली आणि कनिष्ठ व वरिष्ठ विद्यार्थिनींची स्वतंत्रपणे जबानी नोंदवली. समितीने गोपनीयतेचे आश्वासन दिल्यानंतर कनिष्ठ विद्यार्थिनींनी ओळख करून घेण्याच्या बहाण्याने त्यांचा छळ होत असल्याचे कबूल केले. त्यांनी या घटनांमध्ये सहभागी असलेल्या १९ वरिष्ठ विद्यार्थिनींची ओळखही पटवली. चौकशीच्या निष्कर्षांच्या आधारे कॉलेज प्रशासनाने ताबडतोब १९ विद्यार्थिनींना तीन महिन्यांसाठी वसतिगृहात प्रवेश करण्यास बंदी घातली, मात्र त्यांना वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी दिली. त्यांच्याकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले असून पुन्हा असे प्रकार घडल्यास सहा महिन्यांसाठी कॉलेजमधून निलंबन आणि अखेर कायमचे निष्कासन यासह कठोर शिक्षा होईल, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे.

पुनरावृत्ती रोखण्यासाठी कॉलेजने वसतिगृहात रात्रीची गस्त वाढवणे, रात्री १० वाजता नंतर अचानक तपासणी करणे आणि विद्यार्थ्यांचे नियमित समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. पीडित कनिष्ठ विद्यार्थिनींची भीती दूर करण्यासाठी समुपदेशन केले जाईल. कोणत्याही परिस्थितीत रॅगिंग सहन केले जाणार नाही आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.