पोलिस कर्मचाऱ्याने केली ड्युटीवरच आत्महत्या
नागपूर : वरिष्ठांकडून बडतर्फीबाबत मिळालेल्या नोटीसमुळे तणावात असलेल्या पोलिस हवालदाराने ड्युटीवरच विष प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना ग्रामीण पोलिस दलात घडल्याने , पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. रामचंद्र नानाजी रोहणकर ( ५४, पिपळा फाटा, हुडकेश्वर ) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे ते पोलिस मुख्यालयात कार्यरत होते.
२८ जानेवारी रोजी ते कळमना येथे कर्तव्यावर असतांना सायंकाळी त्यांनी विष प्राशन केले त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांचा पत्नीला याची माहिती देण्यात आली. दवाखान्यात नेत असताना त्यांनी पत्नीला मी विष प्राशन केल्याचे सांगितले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. रात्रभर त्यांचावर उपचार चालले मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही व बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये तोडफोड केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. तीन महिन्यापूर्वीच त्यांना कामावर परत घेण्यात आले होते. मात्र, त्यांची विभागीय चौकशी सुरूच होती. आठवडाभरापूर्वीच त्यांना सेवेतून बडतर्फ का करण्यात येवू नये, अशी नोटीस बजाविण्यात आली होती. तेव्हापासूनच ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले का, याबाबत चौकशी सुरु आहे.

बडतर्फ झाल्यास मुलांचा भविष्याचे काय होईल ही चिंता ? : रोहणकर यांचा मुलगा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून मुलगी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. नोकरी गेल्यास मुलांचे शिक्षण कसे करायचे, ही चिंता रोहणकर यांना सतावत होती. सोबतच गृहकर्ज व इतर जबाबदाऱ्यादेखील होत्या. त्यांचा आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे. रोहणकर यांचे पार्थिव गडचिरोलीतील त्यांचा मूळ गावी नेण्यात आले.



