आधी शारीरिक संबंध नंतर प्रेमात फसवणूक; 17 वर्षांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

आधी शारीरिक संबंध नंतर प्रेमात फसवणूक; 17 वर्षांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

पवनने सोनीला सोडण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही दोघे संपर्कात होते आणि त्यांच्या भेटीगाठीही सुरू होत्या. त्यामुळे मोना दुःखी होती. यावरून दोघांमध्ये भांडणही झाले. त्यानंतर पवन आणि सोनीने मिळून मोनाला त्रास दिला.

नागपूर : एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तो तिचे लैंगिक शोषण करत होता. दरम्यान, पीडितेला तरुणाचे दुसऱ्या एका मुलीशी आधीपासूनच प्रेमसंबंध असल्याचे समजले. पीडितेने जाब विचारला असता तरुणाने आधी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि नंतर प्रेयसीसोबत मिळून पीडितेचा छळ सुरू केला. अखेर तणावात येऊन पीडितेने गळफास लावत आत्महत्या केली.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी प्रियकर पवन टेकाम (वय 20) आणि त्याची प्रेयसी सोनी (बदललेले नाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पीडित मोना (बदललेले नाव) ही बारावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील ऑटोचालक आहेत. आई लोकांच्या घरी धुणी-भांडी करते. आरोपी पवन आणि सोनी यांच्यात अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. सोनीशी प्रेमसंबंध असतानाही पवनने मोनाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिचे लैंगिक शोषणही केले. काही दिवसांपूर्वीच मोनाला पवन आणि सोनीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. तिने पवनला याबाबत जाब विचारला.पवनने सोनीला सोडण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही दोघे संपर्कात होते आणि त्यांच्या भेटीगाठीही सुरू होत्या. त्यामुळे मोना दुःखी होती. यावरून दोघांमध्ये भांडणही झाले. त्यानंतर पवन आणि सोनीने मिळून मोनाला त्रास देण्यास सुरूवात केली. त्यामुळे मोना तणावात राहू लागली. सोमवारी तिचे आई-वडील काही कामाने बाहेर गेले होते. या दरम्यान मोनाने राहते घरी पंख्याला दोरी बांधून गळफास लावला.

शेजाऱ्याने पाहिले गळफास लावलेल्या अवस्थेत

शेजाऱ्याने मोनाला गळफास लावलेल्या अवस्थेत पाहून तिच्या आई-वडिलांना माहिती दिली. तात्काळ दोघेही घरी पोहोचले. वडील तिला ऑटोतून रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली सुसाईड नोट

गळफास लावण्यापूर्वी मोनाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने पवन आणि सोनियाकडून छळ होत असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. या चिठ्ठीच्या आधारावर गिट्टीखदान पोलिसांनी पवन आणि सोनीविरुद्ध आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. पवनविरुद्ध लैंगिक अत्याचाराचाही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.